अमरावती : सरकारच्या आश्वासनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन गेल्या महिन्यात मागे घेतले खरे, पण ते अजूनही संघर्षाच्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर ते रस्त्यावर उतरले. त्यांनी भरपावसात १३८ किलोमीटरची पदयात्रा काढली. येत्‍या २४ जुलैला सकाळी ९ ते ११ या वेळात राज्यभरात ‘चक्काजाम’ करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या माध्यमातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा आम्ही पुकारला आहे, हा लढा आता अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोठेही बँक अधिकाऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दुसरीकडे बच्चू कडू यांनी येत्या २ ऑक्टोबरला मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे. २ ऑक्टोबरला मुंबईत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे. पंजाबमधील आंदोलक नेते, शेतकरी हे यात सहभागी होतील. त्यासोबतच राज्यातील शेतकरी नेत्यांना देखील सहभागाविषयी विनंती करू, या आंदोलनात राज्यभरातील शेतकरी सामील होणार आहेत. या माध्यमातून सरकारला कर्जमाफी देण्यास बाध्य करू. हा लढा यशस्वी झाल्यानंतर हमीभावाच्या मुद्यावर आंदोलन होईल, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही मंत्र्यांसोबत बच्चू कडू यांनी स्वतंत्र बैठकीत चर्चा केली. त्यानंतर बच्चू कडू मवाळ भूमिका घेतील, ही भाजपच्या नेत्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे हे नाराज झाले. बच्चू कडू आणि आमचे मंत्री साडेचार तास मंत्रालयात बसून चर्चा करतात. ते वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसून महायुती सरकारवर आरोप करतात. बच्चू कडू हे दुटप्पी आहेत, अशा शब्दात बावनकुळे यांनी आपला त्रागा व्यक्त केला.

देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव पापळ या गावापासून बच्चू कडूंची ‘सातबारा कोरा’ पदयात्रा सुरू झाली. या यात्रेत शेतकरी, महिलांनी, तरुणांनी, आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ‘लाडकी बहीण’ योजना आणताना कोणतीही समिती न करता सरकारने तातडीने निर्णय घेतला, मग कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी समिती कशाला? असा थेट सवाल उपस्थित करत शेतकरी सरकारच्या भूमिकेवर रोष व्यक्त करताना दिसले. यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे या पदयात्रेचा समारोप झाला.

बच्चू कडू यांनी यापूर्वी अन्नत्याग आंदोलन करताना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आश्वासन मिळवले होते. मात्र, त्यानंतर आजपर्यंत कोणतीही ठोस कृती झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. आम्हाला सरकारची सहानुभूती नको, आम्हाला आमचा अधिकार हवा सातबारा कोरा झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरणारच, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसेसह अनेक पक्षांनी बच्चू कडू यांच्या पदयात्रेला पाठिंबा दर्शवला, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील हे पदयात्रेत सहभागी झाले. कर्जमाफीची घोषणा कधी करणार, असा आंदोलकांचा सवाल आहे. आता विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सरकारवर दबावगट तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.