महेश सरलष्कर

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत केरळमध्ये राहुल गांधी यांना भेटायला गेले, तेव्हा गेहलोत हे गांधी घराण्याच्या बाहेरचे नवे काँग्रेस पक्षाध्यक्ष आणि सचिन पायलट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील, असे राजकीय चित्र होते. पण, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून शक्ती प्रदर्शन करताना अप्रत्यक्षपणे सोनिया व राहुल गांधी यांना आव्हान दिल्यामुळे गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाबरोबरच आता मुख्यमंत्रीपदावरही पाणी सोडावे लागणार अशी वेळ येऊन ठेपली आहे.

अशोक गेहलोत यांनी, ‘पक्षाशी एकनिष्ठ राहणे आणि पक्षाची शिस्त पाळणेही गरजेचे असते’, असे ट्वीट करून एकप्रकारे विरोधक सचिन पायलट यांना इशारा दिला. सचिन पायलट यांनी गेहलोत यांचे राजस्थानातील सरकार पाडण्याचा व आमदारांमध्ये फूट पाडून पक्ष बदलाचाही प्रयत्न केल्याचा आरोप गेहलोत गटाने केला. कुठल्याही परिस्थितीत सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले जाऊ नये, असा अट्टहासही गेहलोत गटाने धरला. पण, या खटाटोपामुळे गेहलोत यांनी सोनिया गांधी यांचा विश्वास गमावला असून त्यांनी सोनियांच्या भेटीनंतर गुरुवारी पत्रकारांशी बोलताना, ‘मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता सोनिया गांधीच घेतील’, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे यावेळी गेहलोत यांच्यासोबत राहुल गांधी यांचे निष्ठावान के. सी. वेणुगोपालही होते. त्यामुळे गेहलोत यांनी कोणते जाहीर विधान करावे, हेही त्यांना सांगितले गेले असावे. अन्यथा गेहलोत यांना पत्रकारांशी संवाद साधताना अन्य नेत्याची गरज पडली नसती, अशी चर्चा रंगली होती.

हेही वाचा : सतेज पाटील – महाडिक कुटुंबातील वादाला नव्याने उकळी; राजाराम साखर कारखान्याची सभा गाजणार

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडल्यानंतर, राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात नवा पक्षाध्यक्ष निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे गेहलोत यांच्याकडे जेमतेम महिनाभर मुख्यमंत्रीपद राहू शकते असे मानले जात आहे. पण, बहुतांशी आमदारांचा गेहलोत यांना पाठिंबा असून सचिन पायलट यांच्याकडे असलेले आमदारांचे पाठबळ तुलनेत कमी आहे. पायलट यांच्याकडे आमदारांचे बहुमत नसेल तर, पायलट यांना तरी मुख्यमंत्रीपद कशासाठी द्यायचे असाही विचार केला जाऊ शकतो. सचिन पायलट दिल्लीत असून त्यांनी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याशी चर्चा केली आहे. पण, सोनियांचा कौल मिळाला तरच पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ शकतील. अन्यथा, वर्षभरासाठी एखाद्या गेहलोत निष्ठावानाची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक असून काँग्रेसच्या पक्षांतर्गत फजितीमुळे व गेहलोत सरकारच्या पाच वर्षांच्या निष्क्रीय कारभारामुळे राजस्थानमध्ये सत्तांतर होईल, असा अंदाज आतापासूनच व्यक्त होत आहे.

इंदिरा गांधींच्या काळापासून अशोक गेहलोत, कमलनाथ, गुलामनबी आझाद, अंबिका सोनी, आनंद शर्मा अशा अनेक तरुण काँग्रेस नेत्यांना विविध संघटनात्मक पदे, मंत्रीपदे मिळाली. या तरुण नेत्यांमध्ये गेहलोत हे अत्यंत शांतपणे काम करणारे नेते होते. गेल्या चाळीस वर्षांमध्ये गेहलोत इतके आक्रमक झालेले आम्ही पाहिलेले नव्हते. पहिल्यांदाच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसले, असे प्रांजळ मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. गेहलोत तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले, त्यांनी पायलट यांची बंडखोरीही मोडून काढली होती. उद्योग जगतातही उठबस असलेल्या अपवादात्मक काँग्रेस नेत्यांमध्ये गेहलोत यांचा समावेश होतो. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी गेहलोत हेच समर्थपणे सांभाळू शकतात, असे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे होते. पण, पक्षश्रेष्ठींचा विश्वास गमावल्यामुळे गेहलोत यांना दोन्ही पदे गमवावी लागू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेहलोत यांच्या सोनियांच्या भेटीनंतर काँग्रेसने सर्व नेते-कार्यकर्त्यांसाठी सूचनापत्र काढून, पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यांबाबत वा नेत्याविरोधात जाहीर विधाने करू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. हे सूचनापत्र गेहलोत गटातील आमदारांना दिलेली सज्जड ताकीद असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : संजय शिरसाठांच्या हवाल्याने खैरेंचा एकनाथ शिंदे यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट ; अशोक चव्हाणांच्या वक्तव्यात नवी भर

सचिन पायलट यांची पुन्हा कोंडी?

गेहलोत यांनी, ‘एकाचवेळी दोन पदे समर्थपणे सांभाळता येऊ शकतात’, अशी भूमिका घेत सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला. पण, राहुल गांधींनी गेहलोत यांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर, गेहलोत यांनी गांधी कुटुंबाविरोधात अप्रत्यक्ष बंड केले. या बंडखोरीतून पायलट यांच्याकडे आमदारांचे पुरेसे पाठबळ नसल्याचेही उघड झाले. राहुल गांधी यांनी पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जाते. पण, पायलट यांच्याकडे आता मुख्यमंत्रीपद दिले तर, राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार टिकेल का, हा नवा पेच निर्माण झाला आहे. पायलट यांना बंड करूनही मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, आता कुंपणावर बसूनही ते मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने पायलट यांची पुन्हा कोंडी झाल्याचे दिसू लागले आहे.