आसामच्या धुबरी जिल्ह्यात धार्मिक तणाव सध्या वाढला आहे. आसाममध्ये हिंदू मंदिराची वारंवार विटंबना होत असल्याने प्रदेशात जातीय तणाव वाढला आहे. जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या राज्यातील धुबरी जिल्ह्यात समाजकंटकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश जारी केले आहेत. हिंसाचारग्रस्त भागांना दिलेल्या भेटीदरम्यान सरमा म्हणाले की, मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडली आहे आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १४ जूनला सरमा यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, गोमांस फेकण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत ३८ जणांना अटक केली आहे.

प्रकरण काय?

अलीकडेच आसामच्या गोलपारा जिल्ह्यात जातीय अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात मंदिराजवळ गोमांस फेकल्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी सांगितले. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे. बोदीर अली, हजरत अली, तारा मिया, शाजमल मिया आणि जहांगीर आलोम हे लखीपूर पोलिस ठाणे परिसरातील खाकिलामारी येथील रहिवासी आहेत. आपल्या ‘एक्स’पोस्टमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, “ईद-उल-जुहानंतर जातीय तणाव निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून मंदिराजवळ गोमांस फेकल्याच्या आरोपाखाली गोलपारा जिल्ह्यातील लखीपूर पोलिसांनी खालील व्यक्तींना अटक केली आहे:

  • बोदीर अली (५७), मुलगा दिवंगत जब्बर अली
  • हजरत अली (५८), मुलगा रियाज उद्दीन
  • तारा मिया (३६), मुलगा रूपचंद अली
  • शाजमल मिया (४२), मुलगा दिवंगत हजरत अली
  • जहांगीर अलोम (३२), मुलगा दिवंगत अमोर अली
आसामच्या धुबरी जिल्ह्यात धार्मिक तणाव सध्या वाढला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सर्व रहिवासी वॉर्ड क्रमांक १०, खाकिलामारी, पी.एस. लखीपूर येथील रहिवासी आहेत. सरमा यांनी पुढे म्हटले की, ओळखल्या गेलेल्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अशा सर्व समाज कंटकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

हिमंता बिस्वा सरमा यांनी धुबरी येथे पोलिस संचालक हरमित सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव अजय तिवारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. प्रशासकीय हस्तक्षेप असूनही शहरात तणाव कायम आहे, त्यामुळे त्यांनी प्रभावित मंदिराला भेट दिली असून ते स्थानिक रहिवाशांशी बोलले आहेत. तसेच त्यांनी सुरक्षा तैनातीचा आढावा घेतला आहे. त्यांनी गरज पडल्यास वैयक्तिक दक्षता घेण्याचे आश्वासन देत म्हटले की, ईदच्या दिवशी काही समाजकंटकांनी धुबरीच्या हनुमान मंदिरात गोमांस फेकून एक घृणास्पद आणि निंदनीय गुन्हा केला आहे. येणाऱ्या ईदच्या दिवशी गरज पडल्यास मी स्वतः हनुमान बाबांच्या मंदिराचे रात्रभर रक्षण करेन असे ते म्हणाले.

शुक्रवारी, मुख्यमंत्र्यांनी धुबरीला भेट दिली होती आणि धार्मिक स्थळांच्या अपवित्रतेबाबत अधिकाऱ्यांना झीरो टॉलरन्स धोरण वापरण्याचे निर्देश दिले होते. ते म्हणाले, “शहरातील हनुमान मंदिरात गोमांस फेकण्याची घटना कधीच घडायला नको होती. आता त्यात सहभागी असलेल्यांना वाचवले जाणार नाही,” असे ते म्हणाले.

जातीय तणाव आणि दगडफेकीच्या घटना

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, धुबरीमधील कायदा आणि सुव्यवस्था गेल्या आठवड्यात तणावाखाली होती. ईद अल-अधा (बकरीद) नंतरच्या दिवशी ७ जून रोजी धुबरी शहरातील हनुमान मंदिरासमोर एका गायीचे कापलेले डोके आढळले. या घटनेनंतर हिंदू आणि मुस्लीम समुदायांना शांतता आणि सांप्रदायिक सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा अशाच प्रकारच्या घटना घडल्या, ज्यात दगडफेकीचा समावेश होता. सरमा यांनी असेही स्पष्ट केले की, बकरी ईदच्या एक दिवस आधी ‘नबीन बांगला’ नावाच्या संघटनेने चिथावणीखोर पोस्टर्स लावले होते. त्यातून त्यांनी धुबरीला बांगलादेशात विलीन करण्याचा हेतू व्यक्त केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरमा म्हणाले, “असे घटक स्पष्टपणे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत.” सरमा यांनी सांगितले की, प्रदेश अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीय गटांना खपवून घेतले जाणार नाही. ते म्हणाले, “रात्री धुबरीमध्ये दिसताच गोळीबार करण्याचे आदेश लागू राहतील. अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांविरुद्ध पोलिसांनी निर्णायक कारवाई केली पाहिजे, ” असेही त्यांनी स्पष्ट केले.