मोहन अटाळकर

अमरावती : काही महिन्‍यांपुर्वी अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोप गाजले. हा वाद नंतर शमला. पण, आता अमरावती लोकसभा मतदार संघावर बच्‍चू कडू यांनी दावा सांगितल्‍याने उभय नेत्‍यांमध्‍ये पुन्‍हा एकदा संघर्ष पेटण्‍याची चिन्‍हे आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघावर प्रहार जनशक्‍ती पक्षाने लक्ष केंद्रित केले असून महायुतीत आम्‍हाला ही जागा मिळाली नाही, तर आम्‍ही स्‍वबळावर निवडणूक लढवू, असे बच्‍चू कडू यांनी सांगितले आहे. तर अमरावतीतून नवनीत राणा याच निवडणूक लढतील, असे रवी राणा यांनी ठामपणे सांगितले आहे. मात्र, बच्‍चू कडू यांच्‍या दाव्‍यानंतर राणा दाम्‍पत्‍याची डोकेदुखी वाढली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

बच्‍चू कडू आणि रवी राणा या दोघांचाही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा आहे. दोघेही मंत्रिपदाच्‍या शर्यतीत आहेत. बच्‍चू कडू यांचा प्रहार जनशक्‍ती पक्षाचे दोन आमदार आहेत, त्‍यांना आपल्‍या पक्षाच्‍या विस्‍ताराचे वेध लागले आहेत, तर दुसरीकडे, युवा स्‍वाभिमान पक्षाचा झेंडा उंचावण्‍यासाठी रवी राणांची धडपड सुरू आहे. स्‍थानिक निवडणुकांमध्‍ये रवी राणांच्‍या पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नसली, तरी कार्यकर्त्‍यांचे जाळे मजबूत करण्‍याचे त्‍यांचे प्रयत्‍न आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीच्‍या दृष्‍टीने बच्‍चू कडू आणि रवी राणांमधील स्‍पर्धेच्‍या राजकारणाचा दुसरा अंक सुरू झाल्‍याचे मानले जात आहे. लोकसभेची एक आणि विधानसभेच्‍या १५ ते २० जागा लढण्‍याचा निर्णय आपण घेतल्‍याचे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे. महायुतीत एकत्र लढण्‍याची आमची इच्‍छा आहे, पण ताळमेळ जर होऊ शकला नाही, तर स्‍वतंत्रपणे लढू, असाही त्‍यांचा सूर आहे. यामुळे शिंदे गटासह भाजपचीही डोकदुखी वाढणार आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपकडे या मतदार संघात सक्षम उमेदवार नसल्‍याने भाजप यावेळी नवनीत राणा यांना यावेळी पाठिंबा देणार की, त्‍यांना पक्षाची उमेदवारी बहाल करणार, याची उत्‍सुकता आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्‍पत्‍यासमोर अमरावतीचा खासदार, बडनेराचा आमदार भाजपचा असेल, असा सूचक इशारा दिला होता. त्‍यावेळी अनेकांनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले होते. नवनीत राणा या गेल्‍या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडणूक लढल्‍या होत्‍या. पण, निवडून आल्‍यानंतर लगेच त्‍यांनी केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला. राणा दाम्‍पत्‍याची राजकीय वाटचाल ही हिंदुत्‍वाच्‍या दिशेने झुकल्‍याचे चित्र गेल्‍या दोन वर्षांत प्रकर्षाने पहायला मिळाले. माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍यावर सातत्‍याने टीका करून भाजपच्‍या वर्तूळात स्‍वत:चे स्‍थान मजबूत करण्‍याचा राणा दाम्‍पत्‍याचा प्रयत्‍न आहे.

बच्‍चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता, राज्‍यमंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी देखील त्‍यांना मिळाली. राज्‍यात सत्‍तांतराच्‍या प्रक्रियेत बच्‍चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्‍याचा निर्णय घेतला. पण, अजूनही त्‍यांना मंत्रिपद मिळू शकलेले नाही. दिव्‍यांग कल्‍याण विभागाच्‍या अभियानाचे प्रमुख म्‍हणून त्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला असला, तरी त्‍यावर कडू समर्थक समाधानी नाहीत. बच्‍चू कडू यांना आपली आक्रमक शैली टिकवून ठेवायची आहे, अशा स्थितीत दबावतंत्राचा वापर करण्‍याचा त्‍यांना प्रयत्‍न असल्‍याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे.

बच्‍चू कडू यांनी अमरावती मतदार संघावरील दावा न सोडल्‍यास राणा दाम्‍पत्‍याच्‍या अडचणी वाढण्‍यासोबतच भाजप आणि शिंदे गटावरही ताण येणार आहे. माजी खासदार आणि या मतदार संघावर दावा करणारे इतर नेते हे स्‍वत: नवनीत राणा यांचा प्रचार करतील, असे भाकित रवी राणा यांनी वर्तवले आहे. बच्‍चू कडू यांनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्‍यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता, त्‍यामुळे संतापलेल्‍या बच्‍चू कडूंनी आव्‍हान दिले होते. उभय नेत्‍यांमध्‍ये चांगलाच वाद रंगला होता. अखेर मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मध्‍यस्‍थी करावी लागली होती. आता बच्‍चू कडूंच्‍या नव्‍या भूमिकेतून कोणते वादळ तयार होणार, याची चर्चा रंगली आहे.

Story img Loader