बीड : केज आणि आष्टी या दोन्ही मतदारसंघात अधिक लक्ष देणाार या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचे राजकीय अर्थ काढले जात असून त्यांचे हे विधान आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याभाेवती रिंगण आखले जाईल असे सांगण्यात येत आहे. या शिवाय प्रीतम मुंडेही जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालणार असल्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

दीपावली स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘मी केज आणि आष्टी मतदारसंघात तर प्रीतम मुंडे या माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात जास्त लक्ष घालणार असल्याचे सांगितले. दीपावली स्नेहमीलन कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी आजचा कार्यक्रम अराजकीय नाही हेही सांगितले. त्यामुळे आष्टी मतदारसंघात अधिक लक्ष देणार या वक्तव्याला सुरेश धस यांच्याशी जोडून पाहिले जात आहे. आमदार सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना उमेदवार म्हणून उभे केले असल्याचा आरोप केला होता.

आमदार धस म्हणाले होते, ‘मला हरवण्यासाठी बीड मधील मोठे नेते प्रयत्न करत होते. भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचारही पंकजा मुंडे यांनी केला होता. ’ या राजकीय पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे याचे वक्तव्य अधिक गंभीरपणे राजकीय गोटात चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभवझाला. यावेळी जरांगे प्रारुपाचा देखील फट पंकजा मुंडे यांना फटका बसला होता. केज मतदार संघातून ओबीसी बहुलगावातील मतदानही पंकजा मुंडे यांना मिळाले नव्हते. त्यानंतर शेतकरी पुत्र असे म्हणत बजरंग सोनवणे यांनीही पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. बीड – अहिल्यानगर रेल्वे उद्घाटनाच्या कार्यक्रमातील भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषणात बजरंग सोनवणे यांचे कौतुक केल्याचे दिसून आले होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच मी केज मतदार संघात लक्ष घालणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटल्याने भुवया उंचावल्या आहेत.

दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाता पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.गेवराई आणि माजलगाव मतदार संघाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी मी प्रीतम मुंडे यांच्याकडे देणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये एकत्र काम करायचे झाल्यास पंकजा मुंडे यांच्याऐवजी प्रीतम मुंडे यांच्यासोबत काम करू अन्यथा आमचे मार्ग मोकळे असतील, असे म्हटले होते. त्यामुळे डॉ. प्रीतम मुंडे या आता राजकीय निर्णयात पुन्हा सहभागी होतील, असे संकेत देण्यात आले आहेत.