रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीची जाहीर सभा पार पडली. यावेळी इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष एकाच व्यासपीठावर आल्याचं बघायला मिळालं. तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीकाही करण्यात आली. पंतप्रधान मोदी हे निवडणूक फिक्स करत आहेत, असा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे जागावाटपावरून मतभेद सुरू असताना हे पक्ष एकाच व्यासपीठावर आल्याने विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले. निवडणुकीपूर्वी एकाच व्यासपीठावर येऊन आम्ही भाजपाच्या विरोधात ठामपणे उभे आहोत, असा संदेश देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीकडून करण्यात आला.

यावेळी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकार निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग हे मोदींच्या टीममधील खेळाडू आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला; तर तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये सत्तेत असताना केलेल्या कामांचा पाढा वाचला. आमच्या सरकारने १७ महिन्यांत पाच लाख तरुणांना रोजगार दिला असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – ईडी, सीबीआय अन् प्राप्तिकर विभागाची कारवाई निवडणुकीचा खेळ बिघडवणार? माजी निवडणूक आयुक्त म्हणाले…

याशिवाय तृणमूल काँग्रेसचे नेतेही व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं. केंद्रातील मोदी सरकारमुळे संविधान धोक्यात आले आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी केली. तसेच पश्चिम बंगालला मिळणारा निधी मोदी सरकारने जाणीवपूर्वक रोखून धरला, असा आरोपही त्यांनी केला.

झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनीदेखील यावेळी मोदी सरकारवर टीका केली. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून ते मोदी सरकारपुढे कधीही झुकणार नाहीत, असे ते म्हणाले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. विशेष म्हणजे या सभेला अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालदेखील उपस्थित होत्या. त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, तसेच अरविंद केजरीवाल निर्दोष असल्याचे त्या म्हणाल्या.

पंजाबमधील जागावाटपावरून काँग्रेसचा ‘आप’ला संदेश

पंजाब वगळता विविध राज्यांत काँग्रेस आणि आप यांच्यात युती आहे. यावरून काँग्रेसने आपला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ”आपण एकत्र झालो तरच काही तरी साध्य करू शकतो. एकमेकांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही, त्यामुळे सर्वात आधी आपण एकत्र येणं आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. दरम्यान, खरगे यांच्या आवाहनानंतर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप यांच्यात युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे १ जून रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा – उच्चशिक्षितांना पंतप्रधान मोदींची भुरळ? इकॉनॉमिस्टचा लेख

तृणमूल काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील जागावाटपाची चर्चा अपयशी ठरली. राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी इंडिया आघाडीबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली. तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीबरोबर होता, आहे आणि पुढेही राहील, असे पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले.