नागपूर: अयोध्येमधील नवनिर्मित राम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षानेे देशभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. विदर्भातील भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी अयोध्येतील कार्यक्रमाचे मतदारसंघातील नागरिकांना निमंत्रण देण्यासाठी श्रीराम रथयात्रा काढली असून भाजप खासदाराने काढलेली ही पहिलीच यात्रा आहे. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेंढेंची रथयात्रा राजकीय वर्तुळाचे चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपने देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. विशेष म्हणजे खासदार मेंढे यांचा राम मंदिराशी संबंध हा श्रीराम जन्मभूमी आंदोलनापासूनचा आहे. १९९० मध्ये बजरंग दलाचे जिल्हा संयोजक असताना कारसेवक म्हणून मेंढे अयोध्येत गेले होते. त्यावेळी त्यांना अटक झाली होती व त्यांना जोनपूर कारागृहात दहा दिवस ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते शिवराजसिंह चव्हाण, राजनाथ सिंह हे देखील होते. आता त्याच जागेवर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बांधले गेले आहे. एकीकडे देशभरात रामनामाचा गजर सुरू असताना कारसेवक असणारे खासदार मेंढे यापासून अलिप्त नाहीत. मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार होत असल्याने स्वत: कारसेवा देणारे मेंढे यांनी अयोध्येतील राममंदिर लोकार्पण समारंभाचे निमंत्रण मतदारसंघातील सर्वसामान्यांना देण्यासाठी २ जानेवारीपासून श्रीराम रथयात्रा काढली आहे. २२ जानेवारीला प्रत्येक रामभक्तांंनी घराबाहेर पडून आनंद साजरा करावा, असे आवाहन ते करीत आहेत.या यात्रेदरम्यान दोन्ही कारसेवांच्या वेळेला आलेला अनुभव लोकांना सांगतात व सोबत असलेल्या पणत्याही भेट देतात. ही यात्रा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात फिरणार आहे. यात्रेला मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्त असल्याने भाजपच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा… प्रकाश आंबेडकर – भाजपमध्ये कोण बाजी मारणार ?

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले सुनील मेंढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे संयोजक म्हणूनही काम केले आहे. भंडारा नगरपालिकेचे अध्यक्ष झाल्यावर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यामुळे भाजपने २०१९ मध्ये प्रथमच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि पक्षाने त्यांच्यावर टाकलेला विश्वास त्यांनी निवडणूक जिंकून सार्थ ठरवला होता. चार वर्षात त्यांनी मतदारसंघावर पकड अधिक मजबूत केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा भंडारा – गोंदियातून निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत आहेत. त्यांनी काढलेल्या श्रीराम रथ यात्रेकडेही याच अनुषंगाने बघितले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकीय किनार

राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाल्यावर या गटाचे नेते प्रफुल्ल पटेल पुन्हा भंडारा-गोंदियात सक्रिय झाले आहेत. ही जागा भाजपकडे असली तरी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी या जागेसाठी प्रयत्न करणार, अशा चर्चा आहेत. पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत असलेल्या छायाचित्रांचे फलक मतदारसंघात लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार मेंढे यांची रथयात्रा सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या यात्रेला मिळणारा प्रतिसाद विरोधकांसाठी चिंता निर्माण करणारा आहे.