Karnataka BJP vs Congress News : महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारकडे वळवलं आहे. बिहारमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, त्याआधी पक्षाला कर्नाटकात मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी काँग्रेसकडून आमच्या पक्षातील आमदारांना फूस लावली जात असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेसनेही या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपाचे १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.
राज्याचे उद्योगमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते एम. बी. पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, भाजपात सध्या प्रचंड अस्वस्थता असून काही आमदारांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमच्याकडे सध्या १४० हून अधिक आमदारांच संख्याबळ आहे. काँग्रेस सरकार पाडण्याचे भाजपाचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण त्यासाठी किमान ८० ते ८५ आमदार फुटायला हवेत. २०१९ मध्ये त्यांनी आमचे १९ आमदार फोडले आणि सत्ता काबिज केली होती; पण आता तसं होणार नाही. तुम्ही कोणत्या ‘ऑपरेशन कमळ’बद्दल बोलत आहात? आज त्यांच्या आमदारांनीच आमच्याकडे यायचे प्रयत्न सुरू केले आहेत.”
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही दावा केलाय की, भाजपामधील काही आमदारांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विजयेंद्र समर्थक गट आणि जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील गटांमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे अनेक भाजपा आमदार नाराज झाले आहेत. जेडीएसमध्येही एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वावर नाराजी आहे. काही आमदार पक्षांतरासाठी तयार असून योग्य वेळेची वाट पाहत आहेत, असंही ते म्हणाले.
आणखी वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी नेमकी कशासाठी? काय आहेत त्यामागची कारणं?
काँग्रेस स्वतःचेच आमदार विकत घेतेय- भाजपाचा आरोप
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रल्हाद जोशी यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघेच सत्तेच्या संघर्षात घोडेबाजार करत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी असा आरोप केला होता की, भाजपाने काँग्रेसच्या ५५ आमदारांची यादी तयार केली आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या देऊन फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना जोशी म्हणाले, “हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. वास्तविक काँग्रेसच स्वतःचे आमदार विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण त्यांना मुख्यमंत्रिपद वाचवायचं आहे. त्यांचे अंतर्गत सौदे लपवण्यासाठी हे सगळं नाटक केलं जात आहे.”
‘ऑपरेशन कमळ’ पुन्हा चर्चेत
- कर्नाटकमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे ‘ऑपरेशन कमळ’ पुन्हा चर्चेत आलं आहे.
- २००८ मध्ये भाजपाने प्रथम हे ऑपरेशन राबवून बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापन केली होती.
- २०१९ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस-जेडीएस युतीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने हेच धोरण वापरले होते.
- त्यावेळी काँग्रेसचे १९ आणि जेडीएसचे ३ आमदार राजीनामे देऊन भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.
- परिणामी सत्तास्थापनेनंतर अवघ्या १४ महिन्यांतच काँग्रेसचे सरकार कोसळले आणि येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री झाले.
- मात्र, त्यानंतर येडियुरप्पा यांची जागा बसवराज बोम्मई यांनी घेतली आणि कर्नाटकचे राजकारण पूर्णत: बदलले.

भाजपाकडून आमदारांना ५० ते १०० कोटींची ऑफर – काँग्रेसचा आरोप
भाजपाकडून कर्नाटकमधील सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याआधीही अनेकदा अशा प्रकारचे दावे करण्यात आले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये मंड्याचे काँग्रेस आमदार रवीकुमार गौडा यांनी खळबळजनक दावा केला होता की, भाजपाने आमदारांची खरेदी करण्यासाठी ५० कोटींवरून थेट १०० कोटी रुपयांपर्यंतची ऑफर वाढवली आहे. “काँग्रेसच्या एका आमदाराने मला फोन करून सांगितलं की, आपल्या पार्टीचे ५० आमदार फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ते प्रत्येकी ५० ते १०० कोटी खर्च करायला तयार आहेत. त्यावेळी मी त्या आमदाराला पैसे ठेवून द्यायला सांगितलं. या संदर्भात मी ईडीकडे तक्रार करण्याचा विचारही केला होता,” असं गौडा यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : Maharashtra Politics : ठाकरे बंधूंची युती झाल्यास निवडणुकीत कसं जुळणार मतांचं समीकरण?
काँग्रेसचे नेते एम. बी. पाटील यांनी काय दावा केला होता?
“भाजपाच्या नेत्यांकडून दररोज आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण कोणीही त्यांच्या जाळ्यात अडकत नाही. आमचं सरकार स्थिर आहे आणि आमचे मुख्यमंत्री बळकट आहेत,” असंही गौडा यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, नोव्हेंबर २०२३ मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते व मंत्री एम. बी. पाटील यांनी दावा केला होता की, भाजपाचे २० हून अधिक व जेडीएसचे सुमारे १० आमदार काँग्रेसमध्ये यायला उत्सुक आहेत. विशेष म्हणजे हे वक्तव्य त्यावेळी करण्यात आले होते, जेव्हा एच. डी. कुमारस्वामी यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन देऊन १९ आमदारांचा पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती. मात्र, आता राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. कुमारस्वामी व शिवकुमार हे एकमेकांचे कट्टर विरोधक झाले आहेत. त्याचबरोबर कुमारस्वामी आता केंद्रात मंत्री आहेत व त्यांच्या जेडीएस पार्टीने भाजपाबरोबर युती केली आहे. यादरम्यान, काँग्रेस-भाजपाचे नेते एकमेकांवर घोडेबाजारीचा आरोप करीत असल्याने राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.