छत्रपती संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली असून सतीश चव्हाण यांच्यासमोर भाजप उमदेवार उभा करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपने पदवीधर मतदारसंघात मतदारांची नोंदणी करण्यासाठी आमदार संजय केनेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. गंगापूरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये या पूर्वी ‘ मैत्रीपूर्ण’ लढत झाली होती. त्यामुळे पदवीधरमध्ये पुन्हा ‘ मैत्रीपूर्ण’ अशी तयारी सुरू झाली आहे. या सुशिक्षित मतदारसंघात पूर्वी ‘ जात ’ पाहिली जात असे. तो जातीय तणाव दूर करण्यासाठी भाजप निवडणुकीत उतरेल असे संजय केनेकर म्हणाले.

नोंदणी प्रमुख असणाऱ्या व्यक्तीला उमदेवारी देण्याचा प्रघात भाजपमध्ये नाही. पण पक्षाने आदेश दिला तर कोणत्याही आखाड्या उतरू असे आमदार संजय केनेकर यांनी सांगितले. दरम्यान भाजपमधून पूर्वीचे नोंदणी प्रमूख प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, बसवराज मंगरुळे यांच्यासह नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासमवेत भाजपमध्ये आलेले माजी आमदार अमर राजूरकर यांची नावेही चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारीचे निर्णय घेताना कोणते निकष लावले जातील, हे अद्यापि ठरलेले नाही. पदवीधर मतदारसंघाच्या आखाड्यात गेल्या वेळी तीन लाख ५२ हजार ३९६ एवढी नोंदणी झाली होती.

ऐन करोनाकाळात झालेल्या या मतदानात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या अभुतपूर्व पक्षांतरानंतर सतीश चव्हाण काही दिवस शरद पवार यांच्यासमवेत थांबले. गंगापूर मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली. ते पराभूत झाले. या मतदारसंघातून आमदार प्रशांत बंब ५०१५ मतांनी निवडून आले. आमदार चव्हाण यांनी पदवीधर मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवला. म्हणजे गेली १८ वर्षे या मतदारसंघावर सतीश चव्हाण यांचे वर्चस्व आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे मोठे जाळे मराठवाडाभर असल्याने या मतदारसंघावरची पकड त्यांना कायम ठेवता आली.

पदवीधराच्या नोंदणीपासून ते मतदान करवून घेण्यापर्यंतची यंत्रणा त्यांच्याकडे असल्याचे भाजपच्या नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्या विरोधात भाजपचा उमदेवार कोण, याची उत्सुकता सर्वत्र आहे. पदवीधर मतदारसंघाच्या पूर्वीच्या निवडणुकीतील मतदानामध्ये ‘ मराठा विरुद्ध ओबीसी’ असे सूत्र होते. ते सूत्र पुन्हा कायम राहते का, हे उमेदवार निवडीवर ठरणार आहे. या मतदारसंघातील प्रचारा दरम्यान देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार असे चित्र दिसू शकते. मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असे राजकीय चित्र पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रंगवले गेले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचीही चाचपणी केली जात आहे. १८ वर्षापूर्वाी जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी या भाजपच्या उमेदवारांकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काढून घेतला. या मतदारसंघात पून्हा ‘ मैत्री ’ पूर्ण लढत करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.