नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने आपल्या विकास आराखड्यात लोकपयोगी वापरासाठी आरक्षीत केलेल्या भूखंडांची एकामागोमाग एक अशी विक्री करणाऱ्या सिडको प्रशासनाविरोधात आरोपांच्या फैरी झाडत वन मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. ‘स्वत:च्या लहरीकरता १४ गावांचा भुर्दड नवी मुंबईकरांच्या माथ्यावर मारला आणि नवी मुंबईकरांसाठी आरक्षीत असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले’ असा आरोप करत नाईक यांनी आगामी निवडणुकीत हेच प्रचाराचे प्रमुख मुद्द असतील असे जाहीर केले आहे.

नाईकांची ही भूमिका म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना स्वतंत्र्यपणे समोरे जाण्याची तयारी असल्याची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, नगरविकास विभाग, सिडकोच्या कारभारावर टिकेचे आसूड ओढताना नाईकांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

राज्यात मंत्रीपद स्विकारण्यापुर्वीपासूनच गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिकेचा भडीमार सुरु केला आहे. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना १४ गावांच्या समावेशावरुन नाईक यांनी शिंदे यांना लक्ष्य केले होते. मंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर नाईक अधिकच आक्रमक झाले असून संधी मिळेल तेव्हा ते शिंदे यांना लक्ष्य करतात असे चित्र आहे. शहराला एमआयडीसीच्या बारवी धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या मुद्दयावरुन नाईक यांनी यापुर्वीच शिंदे यांना लक्ष्य केले आहे. बारवीच्या पाण्याचा अपेक्षीत कोटा नवी मुंबईला दिला जात नाही यावरुन नाईक नाराज आहेत. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची आखणी सुरु असताना नाईक यांनी अधिक आक्रमकपणे सिडको आणि नगरविकास विभागावर टिका सुरु केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवू नये असा नाईक यांचा आग्रह आहे. आपल्या समर्थक नगरसेवकांच्या स्वतंत्र्य बैठका घेण्याचा सपाटा नाईक यांनी अलिकडच्या काळात लावला असून नुकत्याच वाशीत त्यांनी महापालिका आयुक्त डाॅ.कैलाश शिंदे यांच्या उपस्थितीत प्रती जनता दरबारच भरविला. त्यानंतर त्यांनी शिंदे यांचे नाव न घेता महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आपला प्रमुख अजेंडा काय असेल हे जाहीर करताना ‘एकला चालोरे’ची पुन्हा एकदा हाक दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईकांचा नवा आरोप काय ?

सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईतील जनतेसाठी मिळायला हवे होते, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले असा आरोप नाईक यांनी नुकताच केला आहे. ‘हा माझा हा जाहीर आरोप आहे. जर या गोष्टी दुरुस्त झाल्या नाहीत. नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हितासाठी जे भूखंड हवे आहेत ते जर मिळाले नाहीत तर आगामी निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा हा असेल’, असे नाईक म्हणाले.. भूखंड चोरले आणि स्वत:च्या स्वार्थासाठी बिल्डरांच्या घशात घातले. अशा लोकांना तुम्ही सन्मानित करणार आहात का, असे आवाहन मी नवी मुंबईकरांना या निवडणुकांमध्ये करणार आहे, असे नाईक म्हणाले. शहराचे पाणी चोरले, प्राणवायूचे सिलेंडर चोरले, अैाषधे चोरली, स्वत:च्या लहरीकरता सहा हजार कोंटींचा भुर्दड शहरावर टाकला, अशा आरोपांची सरबत्ती नाईकांनी पुन्हा एकदा केली आहे. महापालिकेच्या निवडणुका स्वतत्र्यपणे लढविल्या जाव्यात यासाठी आग्रही असलेल्या नाईकांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत असताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मात्र ‘शहराचे खरे चोर कोण’ असा टोला लगावित शिंदे यांच्या अप्रत्यक्षपणे बाजू घेतल्याची चर्चा आहे.