ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडताच गेले वर्षभर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात अस्तित्वात आलेल्या ‘शिंदे’शाहीमुळे अस्वस्थ झालेल्या भाजप नेत्यांना रविवारी राज्यातील सत्तेत झालेल्या अजित पवार यांच्या प्रवेशामुळे मात्र आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत.

मंत्रीपद मिळूनही मुख्यमंत्र्यांच्या प्रभावापुढे ठाणे जिल्ह्यात नामधारी ठरलेले रविंद्र चव्हाण, साताऱ्यातून आयात केलेले पालकमंत्री, ठाणे-कल्याणात खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढता प्रभाव आणि पक्षवाढीला वाव असूनही पक्षातील ‘चाणाक्या’नी फिरवलेली पाठ यामुळे सत्ता असूनही ठाणे जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये पोरकेपणाची भावना वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर दादांच्या सत्ता प्रवेशामुळे जिल्ह्यातील शिंदेशाहीला वेसण बसू शकेल अशी आशा भाजप वर्तुळात व्यक्त होत असून दबक्या सुरात का होईना या घडामोडींविषयी पक्षाचे नेते, पदाधिकारी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात एकनाथ शिंदे यांनी निर्णायक भूमीका बजावली. या बदल्यात भाजप श्रेष्ठींनी त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलेच शिवाय ठाणे जिल्ह्यात मुक्त संचाराचा मार्ग मोकळा केल्याची चर्चाही आहे. गेल्या काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील राजकीय समिकरणेही वेगाने बदलू लागली असून एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आता भाजप वरचढ दिसू लागला आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत तसेच जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असली तरी या तीनही ठिकाणी भाजपची ताकद गेल्या काही वर्षांच्या तुलनेत बरीच वाढली आहे.

हेही वाचा – जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार यांच्याबरोबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयात केलेले गणेश नाईक, कपील पाटील, किसन कथोरे, गणपत गायकवाड यासारख्या नेत्यांमुळे जिल्ह्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यातही भाजपची ताकद वाढत असून शहापुरात दौलत दरोडा यासारखा मोहराही गमाविल्याने जुन्या-नव्या दोन्ही शिवसेनेला ग्रामीण भागात वर्चस्वासाठी झगडावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात यापूर्वीच जुन्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपने संजय केळकर यांच्या माध्यमातून भाजपची मांड पक्की बसवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपद मिळताच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे म्हणतील तीच पूर्वदिशा असा कारभार सुरू असल्याने रविंद्र चव्हाणांसह येथील भाजपचे तीन आमदार गेल्या काही काळापासून कमालिचे अस्वस्थ आहेत.

महापालिका, पोलीस दलातील प्रशासकीय नेमणुका, कंत्राटे, विकासकामे, प्रशासकीय धोरणे यामध्ये शिंदे म्हणतील तीच पूर्वदिशा असा कारभार असल्याने राज्यातील सत्तेत असूनही आपणाला स्थानिक राजकारणात मात्र किंमत नाही या विचाराने भाजपमधील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. नवी मुंबईसारख्या शहरात गणेश नाईक यांच्या माध्यमातून स्थानिक राजकारणावर भाजपने एकहाती पकड निर्माण केल्याचे चित्र आहे. असे असले तरी येथील महापालिकेत मात्र ठाणेकरांचा हस्तक्षेप वाढल्याच्या चर्चेने नाईक यांच्या गोटातही चलबिचल आहे. या पार्श्वभूमीर रविवारी झालेल्या घडामोडीमुळे शिंदे यांच्या वाढत्या महत्वकांक्षेला वेसण बसू शकते या शक्यतेने भाजप नेते खुशीत असल्याचे दिसू लागले आहे.

हेही वाचा – देशातील १२ राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री

ठाण्यावरील दावा आक्रमक होणार ?

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी भाजपचे डोंबिवली विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करताच गेल्या महिन्यात भाजपमधील नाराजीचा स्फोट झाल्याचे पहायला मिळाले. ही नाराजी इतकी टोकाला पोहोचली की शिंदे पिता-पुत्राच्या एकाही कार्यक्रमाला सहकार्य करायचे नाही अशी भूमीका भाजप नेत्यांनी घेतली. त्यापाठोपाठ ठाण्यातही भाजप नेत्यांनी ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा सांगत शिंदेना डिवचण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी ठाण्यातील आनंदनगर भागात भाजपच्या एका प्रभाग अध्यक्षाविरोधात थेट ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामागे शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्याने बजावलेली भूमीका स्थानिक भाजप नेत्यांना फारशी रुचली नव्हती.

ठाणे महापालिकेत शिंदे समर्थक माजी नगरसेवकांना कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला जात असताना भाजप नगरसेवकांच्या प्रभागात छदामही मिळत नसल्याची ओरड आहे. हे सगळे होत असताना पक्षाचे ‘चाणक्य’ ठाण्यातील पक्ष संघटनेचे दुखण्याकडे ठरवून कानाडोळा करतात अशी भावना आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने शिंदे गटाच्या एकाधिकारशाहीला वेसण बसेल अशी आशा भाजपमधून व्यक्त होताना दिसत आहे.

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात तीन पक्षांचे तीन मंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशामुळे जनमानसात फारसा सकारात्मक संदेश गेल्याचे चित्र सध्या नसले तरी स्थानिक पातळीवर आमचे जगणे मात्र सुसह्य होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली. मंंत्रिमंडळ विस्तारात ठाणे जिल्ह्यात पक्षाला आणखी एक मंत्री मिळू शकेल, असा विश्वासही पक्षात व्यक्त होत आहे.