Rahul Gandhi Raebareli Visit BJP Internal Conflicts : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात रायबरेली मतदारसंघाचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले; तर भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. १० सप्टेंबर रोजी राहुल गांधी हे लखनऊ येथून रायबरेलीकडे जात असताना भाजपाचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी आपल्या समर्थकांसह त्यांच्याविरोधात आंदोलन केले. बिहारमधील दरभंगा येथे राहुल गांधींच्या व्होटर अधिकार यात्रेदरम्यान काँग्रेसच्या एका कथित कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले होते. त्याच वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या विधानाची जबाबदारी स्वीकारून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी, अशी मागणी दिनेश प्रताप सिंह यांनी केली. दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी रायबरेलीत जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीत शासकीय योजनांचा आढावा घेतला जात असताना राहुल गांधी आणि दिनेश प्रताप सिंह यांच्यात जोरदार वादावादी झाली. या वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले होते आणि त्या बैठकीला रायबरेली जिल्ह्यातील अनेक आमदार आणि जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. बैठकीत मंत्री दिनेश प्रताप सिंह हे आपले मत मांडत असताना राहुल गांधी यांनी त्यांना मधेच रोखले. आपले मत मांडण्यापूर्वी तुम्ही अध्यक्षांची परवानगी का घेतली नाही, असा जाब त्यांनी दिनेश सिंह यांना विचारला. त्यावर भाजपाच्या मंत्र्याला राग अनावर झाला आणि दोघांमध्ये वादावादी झाली.
विशेष बाब म्हणजे या बैठकीत सदर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार आदिती सिंह यादेखील उपस्थित होत्या. राहुल गांधी आणि दिनेश सिंह यांच्यात वाद सुरू असताना त्यांनी शांत राहणेच पसंत केले. समाजवादी पार्टीतून निलंबित करण्यात आलेले ऊंचाहार विधानसभाचे निलंबित आमदार मनोजकुमार पांडे यांनी दरभंगा प्रकरणात राहुल गांधी यांना भूमिका मांडण्यास सांगितले. मात्र, त्यावर काहीही न बोलताना राहुल हे बैठकीतून बाहेर पडले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत समाजवादी पार्टीने मनोज कुमार पांडे यांची जूनमध्ये हकालपट्टी केली होती. आता ते भाजपाशी संलग्न असून, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका करीत आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांना लक्ष्य करून, मंत्री दिनेश सिंह आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत असल्याचा दावा काही भाजपा नेत्यांनी केला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या आदेशांचे कार्यकर्त्यांनी पालन केले पाहिजे. भाजपाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील, तो कार्यकर्त्यांनी पाळायला हवा. त्यांनी उगाच कोणत्याही स्पर्धेचा भाग होऊ नये. सध्या काही नेते स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण पक्षश्रेष्ठींचे त्यांच्यावर बारकाईने लक्ष आहे.”

भाजपामधील अंतर्गत सत्तासंघर्षामुळे मंत्री दिनेश प्रताप सिंह, आमदार अदिती सिंह व आमदार मनोजकुमार पांडे यांचे परस्पर संबंध ताणले गेले आहेत. पक्षातील वरचष्म्याच्या स्पर्धेमुळे तिघेही रायबरेलीत भाजपाचे प्रमुख चेहरे म्हणून स्वतःला पुढे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिनेश प्रताप सिंह हे आधी काँग्रेसमध्ये होते. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी सोनिया गांधी यांच्याविरोधात भाजपाने त्यांना रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी सोनिया यांच्या विजयाचा फरक २०१४ मधील ३.५२ लाखांवरून १.६७ लाखांवर आणला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने त्यांना राहुल गांधी यांच्याविरोधात रायबरेलीतून उमेदवारी दिली. मात्र, त्यावेळी तब्बल तीन लाख ९० हजार मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतरही भाजपाने त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रिपद दिले.

आदिती सिंह यादेखील आधी काँग्रेसमध्ये होत्या. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या त्या रायबरेली जिल्ह्यातील भाजपाच्या एकमेव महिला आमदार आहेत. आमदार मनोज कुमार पांडे हे आधी समाजवादी पार्टीत होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यसभा निवडणुकीदरम्यान त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या निवडणुकीत मनोजकुमार पांडे यांनी भाजपाच्या उमेदवारांच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप झाला होता. समाजवादी पार्टीतून हकालपट्टी झाल्यानंतर पांडे यांनी भाजपाशी जवळीक साधली. आता त्यांना २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची आशा आहे. त्यामुळेच मनोजकुमार पांडे हे राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहेत.

राहुल गांधी यांच्याबरोबर बैठकीत वाद झाल्यानंतर मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना आमदार आदिती सिंह म्हणाल्या, “विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या ‘दिशा’ बैठकीत आपण स्वत:ला वादांपासून दूर ठेवायला पाहिजे. अशा बैठकांमध्ये सर्व नेत्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या हितासाठी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” १३ सप्टेंबर रोजी आदिती यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘दिशा’ बैठकीदरम्यान घडलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली.
भाजपामधील अंतर्गत वादावर काँग्रेसची टीका
भाजपामध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत वादावर काँग्रेसने टीका केली. “या घटनांमुळे भाजपा आणि त्यांच्या नेत्यांची प्रतिमा खराब झाली आहे. एका मंत्र्याची (दिनेश सिंह) त्यांच्याच पक्षातील आमदारकडून (आदिती सिंह) मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जात आहे. सध्या रायबरेलीत राहुल गांधी यांच्यावर सर्वाधिक टीका कोण करतं याचा सामना रंगला आहे. या टीकेच्या माध्यमातूनच आपल्याला भाजपामध्ये ओळख मिळेल आणि मोदी-शाह आपल्या नेतृत्वाची दखल घेतील, असे त्यांना वाटत असावे”, असा टोला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने लगावला आहे.