अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार यांना समाज माध्यमावरील ‘रील’मधून अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल-परवा उघडकीस आल्यानंतर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यापुर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना फोनद्वारे, पत्राच्या माध्यमातून धमक्या मिळाल्या आहेत. त्यांना लक्ष्य का केले जात आहे, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
‘इसाभाईएस’ या इन्स्टाग्राम खात्यावरून एका तरूणाने नवनीत राणा यांना ‘रील’च्या माध्यमातून धमक्या दिल्या आहेत. भारत हा सर्वधर्मीय लोकांचा देश आहे. तू जर जातीयवादाच्या गोष्टी करशील, तर यावेळी सोडले जाणार नाही, थेट ठार मारले जाईल, असे शब्द या तरूणाने वापरले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने राणा यांच्या स्वीय सहायकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित खातेधारकाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला. भाजपच्याच सत्ताकाळात भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो, याचीही वेगळी चर्चा रंगली.
नवनीत राणांना धमकी मिळाल्याचे हे पहिले प्रकरण नाही. गेल्या मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असताना ‘सिंदूर’चा उल्लेख करीत नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या भ्रमणध्वनीहून हे कॉल आले होते. राणा त्यावेळी मुंबईत होत्या. त्यांनी खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांना धमकीचे पत्र स्पीडपोस्ट द्वारे प्राप्त झाले होते.
अमीर नावाच्या व्यक्तीने हैदराबाद येथून हे धमकीचे पत्र पाठवले होते. तुम्ही हिंदूंबाबत अधिक बोलता हे योग्य नाही. मला दहा कोटी रुपये द्या, अन्यथा मी तुमच्या घरासमोर गाय कापली जाईल, तुमच्यासोबत काही अनर्थ देखील मी करणार. तुमच्यावर सामूहिक अत्याचार केला जाईल, अशी धमकी या पत्राद्वारे नवनीत राणा यांना देण्यात आली होती. नवनीत राणा या माजी अभिनेत्री आहेत. ‘हिंदू शेरणी’ असे बिरूद राणा समर्थकांनी त्यांना दिले आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारादम्यान मे २०२४ मध्ये नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ एक सभा घेतली. त्यात १५ सेकंदासाठी पोलीस बंदोबस्त हटवला, तर ओवेसी बंधूना ते नेमके कुठे आहेत, हे कळणार देखील नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा देखील झाला होता.
नवनीत राणा यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यामुळे त्यांनी अनेक राजकीय लोकांची नाराजी ओढवून घेतली असली, तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचीही चर्चा होऊ लागली. ‘स्टार प्रचारक’ हा दर्जाही त्यांना भाजपमध्ये मिळाला. पण, आता वारंवार त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, हा भाजपसाठी चिंतेचा विषय बनला आहे.