Govind Gaude on CM Pramod Sawant : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोप त्यांच्याच सरकारमधील मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी भाजपासह विरोधीपक्षातील नेते यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. सरकारमधील मंत्र्याने बेजबाबदार वक्तव्य केल्याप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संताप व्यक्त केला असून कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंत्री गावडे यांची लवकरच मंत्रिमंडळातून हकालपट्टी होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कारवाईच्या इशाऱ्यानंतर सारवासारव

मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणात सारवासारव केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर माध्यमांवरच फोडलं आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मंत्री गावडे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांबद्दल कोणतेही नकारात्मक वक्तव्य केलेले नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी माझ्याबाबत काय म्हटले यावर मी काहीही भाष्य करणार नाही. कारण, या विषयावर आमच्यात आधीच चर्चा झाली आहे.”

आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये गावडे म्हणाले, “मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना गेल्या रविवारी झालेल्या कार्यक्रमातील वादग्रस्त भाषणासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “UTAA (युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स) च्या मागण्या पुन्हा मांडताना, माझे विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री हे नेहमीच अनुसूचित जमातीच्या (ST) मागण्यांबाबत संवेदनशील राहिले आहेत. त्यांनी युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्सच्या संघर्षात नेहमी साथ दिली आहे.”

आणखी वाचा : माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष भाजपात विलीन होणार?

मंत्री गोविंद गावडे यांनी काय आरोप केले?

२०११ मध्ये अनुसूचित जमातीच्या हक्कांसाठी आंदोलन करताना जमावाच्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या दोन आदिवासी युवकांच्या स्मरणार्थ राज्यात प्रेरणा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमात बोलताना मंत्री गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्यातील कथित भ्रष्टाचारावर टीका केली होती. आपल्या भाषणात गावडे म्हणाले, “करदात्यांचा मोठा निधी आदिवासी कल्याण खात्याला दिला जातो. जर हे खाते हा कार्यक्रम नीट आयोजित करू शकत नसेल, तर याचा अर्थ प्रशासनावर ताबा राहिलेला नाही. माझ्या मते आज प्रशासन कमकुवत झाले आहे. कंत्राटदारांचे फायली श्रमशक्ती भवन (सरकारी इमारत) मध्ये लपूनछपून हाताळल्या जातात. त्यांच्याकडून काही पैसे घेतल्यानंतरच या फायली सादर करायला सांगितले जाते.”

“आदिवासी भवनाच्या बांधकामाची मागणी आदिवासी समाजाकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी आपली जमीन दिली. जेव्हा मी आदिवासी कल्याण खात्याचा मंत्री होतो, तेव्हा या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ झाला होता. मात्र, हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. या प्रकल्पात अजूनही प्रगती का झालेली नाही?, असा प्रश्नही गावडे यांनी उपस्थित केला होता. युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्सच्या मुख्य मागण्या असलेल्या आदिवासी भवन प्रकल्पाला गेल्या तीन वर्षांपासून स्थगिती मिळाल्याचे सांगत गावडे यांनी मुख्यमंत्री सावंत यांना यामध्ये त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली. “मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विभागाला योग्य मार्गदर्शन करावे आणि कोणतेही प्रश्न असतील तर ते सोडवावेत,” असे ते म्हणाले होते.

काँग्रेसची भाजपा सरकारवर टीका

दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांच्या याच वक्तव्याला हाताशी धरून विरोधकांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी व्यवहार खात्यातील आरोपांची चौकशी तत्काळ चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव म्हणाले, “मंत्री गावडेंच्या आरोपांनी भाजपा सरकारचा भ्रष्टाचार उघड केला आहे. या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. भाजपाने आता पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे आणि भ्रष्टाचार संपवावा. ‘भिन्न विचारधारेचा पक्ष’ आता आपल्यातील मतभेदांमुळे उघड झाला आहे.”

मंत्री गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई?

मंत्री गावडे यांच्या वक्तव्यामुळे गोव्यातील भाजपा सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे आणि बेजबाबदार वक्तव्ये टाळली पाहिजेत. मी गोविंद गावडे यांच्या विधानाची दखल घेतली असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.” गोव्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही मंत्री गावडे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असून सरकारमधील मंत्र्यांनी शिस्त पाळली पाहिजे. पक्षाच्या वर कोणीही नाही. मी गावडे यांची भेट घेऊन त्यांच्यावर या विषयावर चर्चा करेन, कारवाई नक्कीच केली जाईल,” असं नाईक यांनी म्हटलं आहे.

मंत्र्यांच्या विधानांमुळे भाजपा सरकार अडचणीत?

भाजपाचे नेते व विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले की, जर गवडे यांना काही अडचणी असतील, तर त्यांनी त्या मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करायला हवी होती. दरम्यान, मंत्री गावडे यांच्याआधी भाजपाचे नेते व माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनीही प्रमोद सावंत यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले होते. भाजपा सरकारमधील सर्व मंत्री पैसे मोजण्यात व्यस्त आहेत, असं ते म्हणाले होते. यावरून पक्षनेतृत्वाने त्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर मडकईकर यांनी हे आरोप मागे घेतले होते.

हेही वाचा : नितीश कुमारांना मुस्लीम समुदायाच्या रोषाला का सामोरं जावं लागत आहे?

कोण आहेत मंत्री गोविंद गावडे?

राजकारणात येण्याआधी गोविंद गावडे हे नाट्य कलाकार होते. २०२३ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. प्रियोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गावडे हे गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा वादांमध्ये सापडले आहेत.
फेब्रुवारी २०२४ मध्ये, त्यांच्यावर दक्षिण गोव्यातील काणकोण मतदारसंघात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळालेल्या सुमारे २६ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अपहाराचा आरोप झाला होता. २०२२ मध्ये, सावंत सरकारने पणजीतील कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. यावरून गावडे यांनी वाद निर्माण केला होता. “ताजमहाल बांधताना मुघल सम्राट शाहजहाननेही परवानगी घेतली नव्हती. ३९० वर्षांनंतर आजही तीच परिस्थिती कायम आहे”, अशी टीका गावडे यांनी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२२ मध्ये केला होता भाजपात प्रवेश

अपक्ष आमदार असूनही भाजपाच्या मागील सरकारमध्ये गोविंद गावडे मंत्री होते. त्यांनी आदिवासी कल्याण आणि कला व सांस्कृतिक विभागाचा कार्यभार सांभाळला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, गावडे भाजपामध्ये दाखल झाले आणि प्रियोल मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक धवलीकर यांचा पराभव केला होता. दरम्यान, मंत्री गावडे यांच्या विधानानंतर गोव्यातील भाजपा सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.