पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपने आता पदवीधर मतदार संघांकडे लक्ष केंद्रित केले आहे. १९९० पासून ताब्यात असलेला पुणे पदवीधर मतदार संघ २०२० च्या निवडणुकीत हातातून गेल्याची सल कायम असल्याने निवडणुकीला एक वर्ष असतानाच भाजपने पदवीधरांना आपलेसे करून हा मतदार संघ पुन्हा काबीज करण्यासाठी आखणी सुरू केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्याबरोबरच सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०२० च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव करून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले. त्यावेळी महाविकास आघाडीतील तत्कालीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून निवडणूक लढविल्याने लाड विजयी झाले. हा पराभव जिव्हारी लागल्याने भाजपने यावेळी हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने मागील निवडणुकीतील अपयश पुसून टाकण्यासाठी तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पांडे यांनी यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये ही जबाबदारी पार पाडली आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर पुणे पदवीधर मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजप कामाला लागले आहे. पुणे पदवीधर मतदार संघ हा १९९० ते २००२ पर्यंत सलग भाजपच्या ताब्यात राहिला आहे. या काळात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या मतदार संघाचे नेतृत्त्व केले. २००२ च्या निवडणुकीत मात्र प्रा. शरद पाटील यांनी या मतदार संघातून विजय साकारला होता. २००८ च्या निवडणुकीत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या मतदार संघातून विजयी झाले.
१ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा काँग्रेस, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर होती. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लाड यांच्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण होते. लाड यांचा सांगली जिल्ह्यात लोकसंपर्क असला, तरी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा त्यांना फायदा झाला. त्यामुळे त्यांनी ४९ हजारांच्या मताधिक्याने संग्राम देशमुख यांचा पराभव केला. भाजपने आता या मतदार संघासाठी पदवीधरांवर डोळा ठेवला असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पदवीधरांना नमुना १८ हा अर्ज भरावा लागतो. त्यामध्ये मतदाराचा शैक्षणिक तपशील असतो. त्यामध्ये देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता असावी लागते. पदवीधर मतदार नोंदणीचा राजेश पांडे यांच्याकडे अनुभव आहे. त्यामुळे आता लवकरच भाजपकडून पदवीधर मतदारांच्या नोंदणीचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसाठी यावेळची निवडणूक ही मागील निवडणुकीच्या तुलनेत आव्हानात्मक झाली आहे. तत्कालीन राट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे विभाजन झाले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी शिल्लक असतानाच भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्येही मतदार नोंदणी प्रमुख
राज्यात सात पदवीधर मतदारसंघ आहेत. त्यापैकी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन मतदारसंघांची निवडणूक २०२६ मध्ये घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने पुण्यात राजेश पांडे यांच्याबरोबरच आमदार संजय केनेकर यांची छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी, तर प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सुधाकर कोहळे यांची नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी ‘मतदार नोंदणी प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही पदवीधर मतदार संघांमध्ये २०२० च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. पुण्यातून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, नागपूरमधून काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि छत्रपती संभाजीनगरमधून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हे विजयी झाले होते. या तिन्ही आमदारांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे भाजपने हे तिन्ही मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्यासाठी मतदार नोंदणी प्रमुख नेमण्यात आले आहेत.