BJP Counter to Rahul Gandhi Vote Chori Charge : बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून (SIR) काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी हे सातत्यानं निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाशी संगनमत करून निवडणूक आयोगानं मतचोरी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत भाजपानं थेट गांधी कुटुंबांवरच शाब्दिक हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या भारताच्या नागरिक नसतानाही त्यांचं नाव दोन वेळा मतदान यादीत आलं होतं, असा गंभीर आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्या संदर्भातील काही पुरावेही समाजमाध्यमांवर सादर करण्यात आले आहेत.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “सोनिया गांधी यांचा भारताच्या मतदार यादीशी असलेला संबंध हा निवडणूक कायद्याच्या उघड उल्लंघनांनी भरलेला आहे. कदाचित याच कारणामुळे राहुल गांधींना अपात्र व बेकायदा मतदारांना वैध ठरवण्याची विशेष आवड आहे, अशी टीका अमित मालवीय यांनी केली आहे. राहुल गांधी यांचा बिहारमधील निवडणूक आयोगाच्या विशेष फेरतपासणीला असलेला विरोध हा अनाठायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांचं मतदान अवैध किंवा अयोग्य आहे, अशा लोकांचा मतदानाचा हक्क वाचवण्यासाठी काँग्रेसचे खासदार इतके आग्रही का आहेत, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
सोनिया गांधींचे नाव १९८० साली मतदान यादीत
“सोनिया गांधी यांचं नाव पहिल्यांदा १९८० मध्ये भारताच्या मतदार यादीत नोंदवण्यात आलं होतं. भारतीय नागरिक होण्याच्या तीन वर्षं आधीच हे सगळं करण्यात आलं होतं. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधींच्या अधिकृत निवासस्थानी, १ सफदरजंग रोड येथे राहत होतं. त्या पत्त्यावर नोंद असलेले मतदार म्हणजे- इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी व मेनका गांधी असे होते,” असा उल्लेख अमित मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. ते पुढे म्हणाले, “१९८० मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीचे पुनरावलोकन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये १ जानेवारी १९८० ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली होती. या पुनरावलोकनादरम्यान सोनिया गांधी यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं. हा प्रकार स्पष्टपणे कायद्याचं उल्लंघन आहे. कारण- मतदार म्हणून नोंदणीसाठी व्यक्ती भारतीय नागरिक असणं बंधनकारक आहे.”
आणखी वाचा : राहुल गांधींमुळे चर्चेत आलेल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या त्या घरांमध्ये नेमकी किती माणसं राहतात?
सोनिया गांधींना १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व मिळालं : मालवीय
अमित मालवीय यांनी पुढे सांगितलं, “१९८२ मध्ये विरोधकांनी यावर आवाज उठवल्यानंतर सोनिया गांधी यांचं नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आलं; पण १९८३ मध्ये ते पुन्हा समाविष्ट झाले. मात्र, ही पुनर्नोंदणीही गंभीर प्रश्न निर्माण करणारी होती. त्या वर्षीच्या मतदार याद्यांच्या नव्या पुनरावलोकनात सोनिया गांधी यांचं नाव मतदान केंद्र क्रमांक १४० मधील अनुक्रमांक २३६ वर होतं. त्या वेळीही मतदार नोंदणीसाठी पात्रता तारीख १ जानेवारी १९८३ होती. परंतु, सोनिया गांधी यांना ३० एप्रिल १९८३ रोजीच भारतीय नागरिकत्व मिळालं.”
हा निवडणूक गैरप्रकार नव्हे, तर मग काय? : मालवीय
मालवीय म्हणाले, “सोप्या भाषेत सांगायचं, तर सोनिया गांधी यांचं नाव दोन वेळा नागरिकत्वाची मूलभूत अट पूर्ण न करताच मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. प्रथम १९८० मध्ये इटालियन नागरिक असताना आणि नंतर पुन्हा १९८३ मध्ये जेव्हा त्या कायदेशीरदृष्ट्या भारतीय नागरिक होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांचं नाव भारतीय मतदार यादीत आलं. आम्ही तर हा प्रश्नही विचारत नाही की, राजीव गांधींशी विवाह केल्यानंतर भारतीय नागरिकत्व स्वीकारायला त्यांना १५ वर्षं का लागली. हा जर उघडपणे झालेला निवडणूक गैरप्रकार नव्हे, तर मग काय आहे.”
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर काय आरोप केले?
राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर एकापाठोपाठ एक आरोपांचा भडिमार केला. भाजपानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून अनेक मतदारसंघांत मतचोरी केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल यांचा पहिला आरोप हा निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भातला होता. ते म्हणाले, “भारतात एक काळ असा होता की, जेव्हा ‘ईव्हीएम’ नसताना सगळा देश एकाच वेळी मतपत्रिकेवर मतदान करायचा; पण आताच्या काळात अनेक महिने मतदानाची प्रक्रिया चालते. मतदानाचे इतके टप्पे का केले जातात, यावरून साशंकता निर्माण होते. बऱ्याचदा निवडणुकीचं वेळापत्रक बदललं जातं, हे सगळं निवडणूक नियंत्रित करण्यासाठी केलं जातं.”

राहुल गांधींचा सर्वांत मोठा आरोप कोणता?
राहुल गांधींनी केलेला हा सगळ्यात मोठा आरोप मतचोरीचा आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मतचोरीचा संशय अधिक बळकट झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या पाच वर्षांत जितके नवे मतदार जोडले गेले नाहीत, तितके पाच महिन्यांत जोडण्यात आले. मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर अचानकच मताधिक्यात वाढ होणं, बनावट मतदारांनी मतदान करणं, मतदार यादीत मतदारांचे खोटे पत्ते व अवैध फोटो असणे, कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात एक लाख मतदारांची वाढ होणं, असे असंख्य आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केले आहेत. बिहारमधील निवडणूक आयोगाच्या मतदार फेरतपासणी मोहिमेमुळे अनेकांना मतदानाचे अधिकार गमवावे लागू शकतात, असंही राहुल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पाकिस्तानचे लष्करप्रमुख सडकछाप; असदुद्दीन ओवैसी असं का म्हणाले?
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीची निदर्शने
दरम्यान, इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) बिहारच्या मतदार यादीतील १२४ वर्षांच्या मिंता देवी यांचा फोटो असलेला टी-शर्ट घालून निवडणूक आयोगाविरोधात निदर्शनं केली. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, ” ’मतांची फेरफार’ केवळ एका विधानसभा मतदारसंघात (महादेवपुरा) झालेली नाही, तर त्यामागे एक ठरावीक पद्धत आहे. आम्ही या पद्धतीचा अभ्यास केला आहे. हा गुन्हा प्रत्येक राज्यात व देशभरात मोठ्या प्रमाणात केला जात आहे, अशी आम्हाला खात्री आहे. याच कारणामुळे ‘एक्झिट पोल’ आणि पक्षांचे अंतर्गत सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात चुकीचे ठरतात.
राहुल गांधी म्हणतात, पिक्चर अभी बाकी है!
राहुल गांधी पुढे म्हणाले, “मशीन-रीडेबल मतदार याद्या न देणं व कायदा बदलून सीसीटीव्ही फुटेज नाकारणं यामुळे आम्हाला खात्री झाली की, निवडणूक आयोगानं भाजपाशी संगनमत करून निवडणुका चोरल्या आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडून देशभरातील मतचोरीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही संविधानाचं संरक्षण करीत आहोत. निवडणूक आयोग ‘वन मॅन, वन वोट’ ही संविधानाची मूलभूत संकल्पना अमलात आणण्याचं आपलं कर्तव्य पार पाडत नाही. यापुढे आम्ही थांबणार नाही. पिक्चर अभी बाकी है.” दरम्यान, येत्या काही दिवसांत ४० मतदारसंघांतील मतचोरी उघड केली जाईल, अशी माहिती राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत दिली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात भाजपा विरुद्ध काँग्रेस व निवडणूक आयोग, असा वाद पेटण्याची शक्यता आहे.