नंदुरबार : जिल्ह्यातील महायुतीमधील वाद थांबण्याचे नाव घेत नसून महायुतीमध्येच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) माजी तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विनाकारण भाजपला डिवचून भाजपचे कार्यकर्ते फोडल्याने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी जाहीर केली.

भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी वादावर अजूनही पडदा पडला नसताना आता भाजपच्या अजून एका नेत्याने स्थानिक शिंदे गटाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केल्याने महायुतीतील वाद दररोज वेगवेगळे वळण घेत आहे. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी दोन ते तीन दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशांचा सपाटा लावला आहे. आधी काँग्रेसमध्ये सक्रीय समिधी नटावदकर यांना भाजपमध्ये घरवापसी करुन घेत आता शिंदे गटाच्या माजी तीन नगरसेवकांचा भाजप पक्ष प्रवेश घडवून आणत शिंदे गटाला उत्तर देण्यास सुरवात केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि शहादा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना गळाशी लावून शिंदे गटाने त्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेतला होता. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे दिसून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) या पक्षांमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश महायुतीत करुन घेणे अपेक्षित असतांना शिंदे गटाने मात्र भाजपचे कार्यकर्ते फोडण्याचा लावलेला सपाटा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिल्हारी लागला आहे. त्यामुळेच भाजपने शिंदे गटाचे तीन माजी नगरसेवक संदीप चौधरी , प्रमोद बोडके, जयसिंग राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करुन घेतला. यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी शिंदे गटाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना लक्ष्य केले. शिंदे गटाने भाजपला विनाकारण डिवचण्याचे काम केल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांना विविध आमिष दाखवून शिंदे गटात खेचण्याची त्यांची भूमिका ही महायुतीच्या विरोधातील असल्याचे विजय चौधरी यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत रघुवंशी यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळीची भूमिका ही महायुतीच्या उमेदवाराविरोधात असतांना त्यांनी थेट भाजप पक्ष संघटनेला केलेले लक्ष कदापि मान्य होणार नाही. आता ईट का जबाब पत्थरसे देंगे, असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला. त्यामुळे आधीच भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद विकोपाला असतांनाच आता हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे.