BJP Strategy in Bihar Election 2025 : देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपाने आता आपले लक्ष्य बिहारकडे वळवले आहे. यावर्षीच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे नितीश कुमार यांच्याकडे आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. त्यातच नितीश कुमार यांच्याकडून होणाऱ्या मागणीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. भाजपापेक्षा आपल्या पक्षाला किमान एकतरी जागा जास्त मिळावी असा आग्रह त्यांनी धरला आहे.
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या पक्षाने सर्वाधिक ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यापाठोपाठ भाजपा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ठरला होता. राज्यात भाजपाकडे सध्या ८० आमदार असून, त्यापैकी २२ जणांकडे मंत्रिपद आहे. त्यातील काही आमदारांविषयी मतदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेता भाजपाकडून आगामी निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांविरुद्धची नाराजी ही पक्षासाठी अडचणी ठरत असल्याची कबुली भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे. बिहारमध्ये ‘सत्ताविरोधी लाट’ विरुद्ध ‘सरकारी योजनांचे फायदे’ असा थेट सामना होणार असल्याचे या नेत्याने मान्य केले आहे.
बिहारमध्येही गुजरात पॅटर्न?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बिहारमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करण्यात आला. गुजरातमध्ये २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले होते. त्याचबरोबर १०८ विद्यमान आमदारांपैकी तब्बल ४५ जणांचे तिकीट कापण्यात आले होते. तिकीट नाकारलेल्या नेत्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांचा समावेश होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने छत्तीसगडमधील आपल्या सर्व विद्यमान खासदारांचे तिकीट कापून त्यांच्याजागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती. विशेष बाब म्हणजे भाजपाची ही रणनीती यशस्वी ठरली होती. यापार्श्वभूमीवर आता बिहारमध्येही विद्यमान आमदारांचे तिकीट कापून सत्ताविरोधी लाट थोपवण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे.
भाजपापुढे ‘नवे चेहरे’ शोधण्याचे आव्हान
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला नव्या उमेदवारांची निवड करताना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ‘पक्षाने नव्या आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार पुढे आणले पाहिजेत’, अशी आशा भाजपाच्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. बिहारमधील भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जागावाटपासाठी जनता दल युनायटेडबरोबर बैठका सुरू केल्या आहेत. भाजपाने या निवडणुकीत १०१ ते १०४ मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.
भाजपासमोर बंडखोरी रोखण्याचे आव्हान
भाजपाने काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची तयारी दाखवली असली तरी पक्षाला निवडून येण्याची क्षमता असलेले नवी उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, आमदार अमरेंद्र प्रताप सिंह आणि सी.एन. गुप्ता यांसारखे फक्त दोनच आमदार ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यामुळे इतर आमदारांना उमेदवारी नाकारण्यासाठी पक्षाला काही ठोस कारण द्यावे लागणार आहे. भाजपाने कर्नाटक निवडणुकीतही अनेक विद्यमान आमदाराचे तिकीट कापले होते. त्यातील बऱ्याच नेत्यांनी बंडखोरी करत प्रतिस्पर्धी पक्षांशी हातमिळवणी केल्याने भाजपाला निवडणुकीत मोठे नुकसान सहन करावे लागले होते. बिहारमध्ये भाजपाचे गुजरातप्रमाणे पूर्ण वर्चस्व नाही आणि पक्षातही अनेक तगडे दावेदार आहेत, त्यामुळे नाराज नेत्यांची बंडखोरी भाजपाला मोठी महागात पडू शकते.
भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
जन सुराजचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरील आरोपांचाही समावेश आहे. या आरोपांमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली असून पक्षातील नेते चिंता व्यक्त करीत आहेत. काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रा काढली होती. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाकडून गरीब मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
भाजपा बिहारमधील सत्ता राखणार का?
बिहारमधील सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपा सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. अल्पसंख्याक, महिला आणि वंचित घटकांतील मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात राज्यात सर्वात मोठ्या योजनेची सुरुवात केली. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत तब्बल ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा करण्यात आले. भविष्यातही महिलांना आणखी मदत दिली जाणार असल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून भाजपाला बिहारमधील सत्ता टिकवण्यास यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.