BJP Vote Theft Allegations Against Rahul Gandhi : भाजपानं लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केला. गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावेदेखील सादर केले. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. दरम्यान, राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर भाजपाने पलटवार केला आहे. विरोधी पक्षांनी जिंकलेल्या अनेक लोकसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यामध्ये राहुल गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांचा डायमंड हार्बर मतदारसंघ, तसेच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा कन्नौज मतदारसंघाचा समावेश आहे. या तिन्ही नेत्यांनी मतचोरी करून विजय मिळवल्याचं भाजपाने म्हटलं आहे.
काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांनंतर भाजपाचे नेते व माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राजधानी दिल्लीत बुधवारी (तारीख १३ ऑगस्ट) जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधकांनी जिंकलेल्या काही मतदारसंघातील मतदारयाद्यांचे विश्लेषण करताना ठाकूर यांनी गंभीर आरोप केले. या मतदारसंघातील मतदार यादीत मतदारांची दुबार नावे, बनावट पत्ते, खोटे नातेवाईक, चुकीची वये आणि मोठ्या प्रमाणावर बनावट नोंदणीचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर वायनाड (प्रियंका गांधी वाड्रा), मैनपुरी (डिंपल यादव) आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या कोळथूर विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीतही अनियमितता असल्याचा दावा ठाकूर यांनी केला.
विशेष बाब म्हणजे लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर भाजपाकडून हे आरोप करण्यात आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा दाखला देत राहुल यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रातील दुबार मतदार, बनावट व अवैध पत्ते आणि एकाच पत्त्यावर नोंद असलेल्या मतदारांमुळे एक लाखांहून अधिक मते चोरली गेल्याचा दावा केला होता. येत्या काही दिवसांत काँग्रेसकडून आणखी ४० मतदारसंघांतील मतचोरीचे पुरावे सादर केले जाणार आहेत, असं पक्षातील एका सूत्राने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
आणखी वाचा : भाजपाच्या नेत्याची खासदारकी धोक्यात? काँग्रेसचा मतचोरीचा आरोप; प्रकरण काय?
मतचोरी प्रकरणावरून भाजपाचा विरोधकांवर संताप
- ‘मत चोरी’ व बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष फेरतपासणी मोहिमेच्या (SIR) मुद्द्यावरून मंगळवारी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली.
- त्यानंतर बुधवारी भाजपा नेते अनुराग ठाकूर संताप व्यक्त करीत थेट विरोधी पक्षातील नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
- ठाकूर यांनी दावा केला की, रायबरेली मतदारसंघात सुमारे दोन लाख ९९ हजार संशयित मतदार आहेत.
- त्याचबरोबर डायमंड हार्बर मतदारसंघात दोन लाख ६९ हजार, वायनाडमध्ये ९३ हजार ४९९ बनावट मतदार असल्याचं ते म्हणाले.
- कन्नौजमध्ये दोन लाख ५१ हजार, मैनपुरीत दोन लाख ५५ हजार आणि कोळथूरमध्ये १९ हजार ७७६ संशयित मतदारांची नावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
अनुराग ठाकूर नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, “माझा थेट प्रश्न आहे की, अखिलेश यादव, राहुल गांधी व प्रियांका गांधी वाड्रा आपल्या खासदारकीचा कधी राजीनामा देणार? राहिला प्रश्न ‘प्रोपगंडा किंग’चा, तो तुम्हाला माहीतच आहे. प्रत्येक वेळी मतदारांमध्ये भीती व संभ्रम पसरवणे. निवडणुकीपूर्वी संविधान बदलण्याचा अपप्रचार करून अफवा पसरवणे आणि निवडणूक हरल्यानंतर परदेश दौर्याला निघून जाणे हे विरोधकांचे कामच आहे.” ठाकूर यांनी काँग्रेस तसेच इंडिया आघाडीवर असा आरोप केलाय की, बिहारमधील निवडणूक आयोगाच्या विशेष फेरतपासणी मोहिमेला ते जाणून बुजून विरोध करीत आहेत. बनावट मतपेढीचे संरक्षण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

काँग्रेसने निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा पाया घातला : ठाकूर
१९५२ च्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने निवडणूक भ्रष्टाचाराचा पाया घातला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ हजार ५६१ मतांनी पराभव झाला, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला. १९५७ मध्ये ‘बुथ कॅप्चरिंग’, १९६७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीतील फेरफार आणि १९८८ मध्ये नॅशनल कॉन्फरन्ससोबत संगनमत करून काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर मतदानात गैरव्यवहार केले, असा दाखलाही त्यांनी दिला. दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनाही भाजपाच्या नेत्यांनी लक्ष्य केलं. भारताचे नागरिकत्व मिळवण्यापूर्वी सोनिया गांधी यांचे नाव दोनदा मतदार यादीत आलं होतं, असा दावा भाजपाच्या राष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला.
हेही वाचा : राहुल गांधींमुळे चर्चेत आलेल्या महादेवपुरा मतदारसंघातल्या त्या घरांमध्ये नेमकी किती माणसं राहतात?
सोनिया गांधींचं नाव निवडणूक यादीत दोनदा : भाजपाचा आरोप
मालवीय यांनी गांधी कुटुंबाच्या १९८० च्या मतदार यादीची एक कथित प्रत सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामध्ये सोनिया गांधी यांचे नाव भारतीय नागरिकत्व नसल्यामुळे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा उल्लेख आहे. भारताचे नागरिकत्व मिळवण्याआधी तीन वर्षांपूर्वी म्हणजेच १९८० मध्ये सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे इटलीचे नागरिकत्व होते, असा आरोप मालवीय यांनी केला. “१९८२ मध्ये विरोध झाल्यानंतर सोनिया यांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आले; परंतु १९८३ मध्ये त्यांचा पुन्हा मतदार यादीत समावेश करण्यात आला”, असंही मालवीय म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी दोन ठिकाणी मतदान कसे केले? काँग्रेसचा प्रश्न
दरम्यान, अमित मालवीय यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत म्हणाले, “१९८० मध्ये सोनिया गांधी यांचे नाव मतदार यादीत आले होते. निवडणूक आयोगाची ही चूक काँग्रेस सरकारनेच त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आणि १९८३ मध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले. जेव्हा निवडणूक आयोगाकडून चूक होते तेव्हा आम्ही त्याची जबाबदारी घेतो, कधीच पळ काढत नाही.” यावेळी खासदार भगत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मोदींनी तीनवेळा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे, त्यामुळे त्यांचे नाव तेथील मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मग २०२२ मध्ये त्यांनी साबरमतीत मतदान कसे केले?” असा प्रश्नही सुखदेव भगत यांनी उपस्थित केला.