BJP Nuns Controversy भाजपाशासित छत्तीसगडमध्ये कथित धर्मांतर आणि मानवी तस्करीच्या आरोपाखाली दोन कॅथॉलिक नन्सना अटक करण्यात आल्याने केरळमधील भाजपा सरकार नाराज झाले आहे. त्यातच आता छत्तीसगड प्रशासनाने केरळमधील नन्सविरुद्ध दाखल केलेला खटला केरळ भाजपाने फेटाळून लावला आहे. या मुद्द्यावरून केरळ भाजपा आणि छत्तीसगड भाजपा आमने-सामने आले आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपा सरकार असल्याने हा मुद्दा तापल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, नेमके हे प्रकरण काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

केरळमध्ये भाजपा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडच्या वर्षांत, केरळ भाजपाने राज्यातील ख्रिश्चनांशी संपर्क साधण्यासाठी धर्मांतराच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, छत्तीसगड भाजपाच्या निर्णयाचा परिणाम केरळमधील भाजपावर होणार असल्याची शक्यता आहे.

भाजपातील अंतर्गत वादाचे कारण काय?

  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सोमवारी नन्सविरोधातील पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले. ते म्हणाले, ” हा मुद्दा गंभीर आणि संवेदनशील आहे. तो आपल्या मुलींच्या सुरक्षिततेवर परिणाम करतो आणि त्याला राजकीयदृष्ट्या हाताळला जाऊ नये”.
  • केरळ भाजपाने मुख्यमंत्री साई यांचे विधान फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अटक केलेल्या नन्स कोणत्याही धर्मांतर किंवा मानवी तस्करीमध्ये गुंतलेल्या नव्हत्या.
  • पक्षाचे सरचिटणीस अनूप अँटनी यांना रायपूर येथे पाठवले आहे. ते केरळमधील प्रमुख ख्रिश्चन चेहरा आहेत. त्यांना तुरुंगात असलेल्या नन्सना मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता पाठविण्यात आले आहे.

केरळ भाजपाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले, “आम्ही नन्सना सर्वतोपरी मदत सुनिश्चित करू. आमचे प्रदेश सरचिटणीस सध्या छत्तीसगडमध्ये आहेत आणि अटक केलेल्या नन्सना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. छत्तीसगड हे आदिवासी राज्य असल्याने तिथे धर्मांतरविरोधी कायदा आहे; परंतु मल्याळी नन्सवरील धर्मांतराचे आरोप खरे नाहीत याची आम्हाला खात्री आहे. हा मुद्दा समोर आल्यापासून आम्ही राज्य सरकारशी सतत संपर्कात आहोत. नन्सची जोपर्यंत सुटका होत नाही आणि त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजपा त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास कटिबद्ध आहे.” त्यांनी पुढे म्हटले की, काँग्रेससारखे पक्ष या प्रकरणाचा आपल्या संधीसाधू राजकारणासाठी फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘या’ मुद्द्यावरून काँग्रेसने घेरले भाजपाला

राज्यातील ख्रिश्चन मतदारांमध्ये पाठिंबा गमावल्याचे दिसत असलेल्या काँग्रेसने नन्सच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत आली आहे. त्यानंतर केरळ भाजपाने या मुद्द्याला सावरण्याचा म्हणजेच एकार्थी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर भारतात ख्रिश्चन धर्मगुरूना तुरुंगात टाकणारा, तर केरळमध्ये ख्रिसमस आणि ईस्टरला ख्रिश्चन घरांना भेट देणारा पक्ष, अशी भाजपाची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा काँग्रेसवर आरोप आहे.

कॅथॉलिक चर्चने राजकीय, संख्यात्मक व सामाजिक दृष्ट्या शक्तिशाली सिरो-मालाबार कॅथॉलिक चर्चशी संबंधित असलेल्या दोन नन्सविरुद्ध छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईवर घेतलेली कठोर भूमिका केरळ भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. थ्रिसूरमध्ये अनेक कॅथॉलिकांनी मंगळवारी नन्सच्या अटकेविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी यांनी २०२४ च्या निवडणुकीत थ्रिसूर लोकसभा जागा जिंकल्याने भाजपाने केरळमध्ये पहिली लोकसभेची जागा जिंकली होती. त्यासह अलीकडील संघटनात्मक फेरबदलात भाजपाने राज्य आणि जिल्हा स्तरावरील नेतृत्वात अनेक ख्रिश्चन चेहऱ्यांना समाविष्ट केले आहे.

मात्र, केरळ भाजपाने नन्सच्या अटकेबाबत घेतलेली भूमिका इतर संघ परिवाराच्या संघटनांना पटलेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख नेते व हिंदू ऐक्य वेदीचे प्रदेश अध्यक्ष आर. व्ही. बाबू यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, “उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य वेगळे आहे. त्या ठिकाणी हिंदूंवर लक्ष केंद्रित करून, मोठ्या प्रमाणात धर्मांतर सुरू आहे. चर्च मुस्लीम भागात प्रचारकार्य घेऊन का जात नाही? या मिशनऱ्यांनी फक्त हिंदूंनाच सेवा देण्याची शपथ घेतली आहे का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदू ऐक्य वेदीचे माजी सरचिटणीस भार्गव राम यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, “धर्मांतराबाबत कोणतीही तडजोड करू नये.” त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आपल्याच समुदायाचा मागासलेपणा सुधारण्याचा प्रयत्न करावा. लव्ह जिहादमुळे त्रस्त असलेल्या ख्रिश्चन समाजाने धर्मांतराला विरोध करणाऱ्या बजरंग दलाचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नये.” केरळमधील विविध संघ परिवाराच्या संघटनांशी संबंधित असलेल्या अनेक सोशल मीडिया हँडलनेदेखील उत्तर भारतातील ख्रिश्चन मिशनरी कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी केरळ भाजपा प्रमुख छत्तीसगड वादात हस्तक्षेप करीत असल्याबद्दल आक्षेपही घेतला आहे.