मुस्लीम समुदायाचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपाकडून गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशमधील पसमंदा मुस्लीम यांना जवळ करण्याचा प्रयत्न याआधी झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर आता भाजपाकडून सुफी संवाद महा अभियान राबविले जात आहे, या माध्यमातून सुभी संप्रदायाशी संवाद साधला जाणार आहे. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चा विभागाने १२ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे आयोजित केलेल्या सुफी संवाद महा अभियानासाठी १०० हून अधिक दर्ग्यातील २०० सुफी उपस्थित होते. मोदी सरकारची धोरणे आणि मुस्लिमांसाठी आखलेल्या योजना देशभरात घेऊन जाव्यात, असे आवाहन सदर अभियानाच्या माध्यमातून करण्यात आले.
सुफींच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न
“भारतीय संस्कृतीमध्ये सुफी संप्रदायास विशेष महत्त्व असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुफी संप्रदायाचे कौतुक केले होते. सुफी सामान्य माणसांमध्ये वावरतात आणि धर्म, जात, पंथ आणि श्रद्धा यापलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. भाजपा सरकारची धोरणे आणि कल्याणकारी योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी देशभरातील सुफी संप्रदायाला एकत्र करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. सुफी कार्यक्रम हा पसमंदा मुस्लीम समुदायापेक्षा वेगळा असणार आहे. सुफी अध्यात्मिक गुरुंच्या माध्यमातून भाजपा मुस्लीम समुदायातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.
सिद्दीकी पुढे म्हणाले की, या अभियानाच्या माध्यमातून सुफींनी भाजपामध्ये प्रवेश करावा अशी आमची अपेक्षा नाही. मात्र, त्यांच्या माध्यमातून सामान्य मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाच्या माध्यमातून सामान्य मुस्लीम समुदायाचे प्रश्न काय आहेत आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल. २२ राज्यांतील सुफींपर्यंत पोहोचण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जिथे जिथे सुफी चळवळीचा प्रभाव आहे, तिथे तिथे दहशतवादाला थारा मिळालेला नाही आणि ज्या ठिकाणी सुफी चळवळ कमकुवत आहे, त्या ठिकाणी दहशतवाद खोलवर रुजलेला दिसून येतो, असेही सिद्दीकी म्हणाले.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि काही महिन्यांनंतर लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या असताना भाजपाकडून मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्याचा हा नवा प्रयत्न केला जात आहे. एकट्या उत्तर प्रदेश राज्यात १० हजारांहून अधिक दर्ग्याच्या प्रमुखांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विरोधकांचा प्रचार थांबविण्यासाठी प्रयत्न करणार
उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष कुँवर बासित अली म्हणाले, “राज्यातील सर्व सुफी संतांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल त्यांची एक बैठक आयोजित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफी संप्रदायाबाबत व्यक्त केलेल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. सुफी संप्रदायाचा प्रभाव समाजात प्रेम, शांती आणि बंधुता पसरविण्यासाठी कारणीभूत ठरतो, असे पंतप्रधान मोदी यांचे मानणे आहे. सुफी प्रमाणेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही संत आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारखे विरोधक हे मुस्लीम समाजाला भाजपाविरोधात उभे करण्यासाठी कसे प्रयत्न करत आहेत, याचीही माहिती या बैठकांमध्ये देण्यात येईल.”
“ना दुरी है, ना खाई है, मोदी हमारा भाई है”, अशी घोषणा लखनऊमध्ये झालेल्या अभियानाच्या बैठकीदरम्यान सुफींनी दिली असल्याचे अली यांनी सांगितले. अली पुढे म्हणाले, जर देशातील कोणत्याही भागातील मुस्लीम जनतेला वाटत असेल की भाजपा नेत्यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधवा, तर भाजपा नेते, खासदार आणि आमदार पाठवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार आहे.
देशाच्या सर्व भागांत हिंदू मतांचा पाठिंबा मिळविल्यानंतर भाजपाचे लक्ष आता मुस्लीम समुदायाकडे आहे. संपूर्ण समाजाचा पाठिंबा मिळविण्याऐवजी मुस्लीम समाजातील काही घटकांवरच लक्ष दिलेले आहे. पसमंदा मुस्लीम समाजाला जवळ करून भाजपाने मागासवर्गीय मुस्लीम समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. सुफी संप्रदायाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून भाजपाने मुस्लीम समाजापर्यंत पोहोचण्याचा सर्वसमावेशक प्रयत्न केला आहे.