नाशिक – शिवसेनेतील (उध्दव ठाकरे) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवाह भाजपकडे वळवून मंत्री गिरीश महाजन यांनी मित्रपक्ष शिवसेनेला (एकनाथ शिंदे) महानगरपालिका निवडणुकीत अधिकची संधी मिळणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. शिंदे गटाने महाजन यांच्या पालकमंत्रीपदात खोडा घातला होता. त्याची परतफेड या निवडणुकीत करण्यासाठी भाजपचे संकटमोचक महाजन हे सज्ज झाल्याचे चित्र आहे.
महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपद संघर्षाचे कारण ठरले आहे. तिन्ही पक्षांच्या दाव्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. तूर्तास सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जबाबदारीतून महाजन नाशिकवर प्रभाव ठेवत आहेत. महायुतीतील बेबनाव महानगरपालिका निवडणुकीत अधिक स्पष्टतेने समोर येणार आहे. महाजन यांनी चालविलेली तयारी पाहता भाजपकडून महानगरपालिकेची निवडणूक एकत्रित लढण्याची सुतराम शक्यता नाही. ठाकरे गटाचे सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या पक्ष प्रवेशावेळी महाजनांनी राज्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक नाशिकमधून निवडून आणण्याचा विक्रम रचण्याचे सुतोवाच केले. गतवेळी भाजपचे ६७ नगरसेवक होते. यावेळी हा आकडा १०० पार नेण्याच्या दृष्टीने नियोजन होत आहे. कमकुवत प्रभाग शोधून सुधाकर बडगुजर यांच्यासारख्या वादग्रस्त मंडळींनाही सामावून भाजपने ठाकरे गटच नव्हे तर, शिंदे गटालाही धक्का दिला. बागूल, राजवाडे यांच्यासह माजी नगरसेवकांना भाजपमध्ये खेचून बेरजेच्या राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
पुढील दीड वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होत असल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. देशभरातून कोट्यवधी भाविक कुंभनगरीत येतील. यासाठी महापालिकेने सुमारे १५ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच गिरीश महाजन यांच्यावर सोपविलेली आहे. कुंभमेळा तयारीला वेग देण्यासाठी महापालिकेवर वर्चस्व राखणे भाजपला क्रमप्राप्त ठरेल. शिवसेनेचाही (एकनाथ शिंदे) तसाच प्रयत्न आहे. ठाकरे गटाबरोबर अन्य पक्षातील माजी नगरसेवकांनाही सामावून प्रभागनिहाय समीकरणे जुळवली जात आहेत.
पालकमंत्रीपदापासून वंचित रहावे लागलेले मंत्री दादा भुसे हे निवडणूक तयारीत महाजनांप्रमाणे रस घेताना दिसत नाहीत. शिंदे गटात संघटनात्मक पातळीवर गटबाजीला उधाण आले आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादीचा (अजित पवार) शहरात फारसा प्रभाव नाही. याचा पुरेपूर लाभ उठविण्याची तयारी भाजपने केली आहे. नाशिक भाजप ‘हाऊसफुल्ल‘ झाल्याचे महाजनांचे सांगणे तेच अधोरेखीत करते. मागील निवडणूक भाजप आणि एकसंघ शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. तर शिवसेनेला विरोधी पक्षात बसावे लागले होते. यावेळी भाजप-शिवसेना शिंदे गट परस्परांविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.