पंजाबमधील भटिंडा येथे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कमल कौर भाभी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांचन कुमारी यांच्या हत्येनंतर खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येच्या काही दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी एक व्हिडीओ समोर आला. त्यात कट्टरपंथी दक्षता गटाचा प्रमुख असल्याचा दावा करणारे अमृतपाल सिंग मेहरोनने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, कमल कौरची हत्या त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या अनैतिक आणि अश्लील कंटेंटमुळे केली.
त्यांनी आरोप केला की, या कंटेंटमध्ये शीख मूल्यांची बदनामी झाली आहे आणि ‘कौर’ आडनावाचा वापर करण्यात आला आहे. त्यांनी आक्षेपार्ह कंटेंट तयार करणाऱ्या इतरांनाही अशा कृतींपासून दूर राहण्याची धमकी दिली आहे. कोण आहेत अमृतपाल मेहरोन? त्यांच्यावर आरोप काय? त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली आहे? जाणून घेऊयात.
कोण आहेत अमृतपाल मेहरोन?
- शुक्रवारी, पोलिसांनी पंजाबी इन्फ्लुएन्सरच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे, मात्र अमृतपाल सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- अमृतपाल मेहरोन मोगा जिल्ह्यातील मेहरोन गावातील बाईक मेकॅनिक आहेत.
- २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिरोमणी अकाली दल (अमृतसर) च्या तिकिटावर तरनतारन मतदारसंघातून निवडणूक लढवली.
- या निवडणुकीत फक्त ६,३६३ मते मिळाली आणि त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर ते पक्षापासून वेगळे झाले.
- तरनतारनमधील अकाली दल (अमृतसर)चे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलबाग सिंग पट्टी यांनी सांगितले की, अमृतपाल यांनी त्यांचा पक्ष सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
- अमृतपाल त्यांच्या संघटनेला ‘कौम दे राखे’ म्हणजेच समुदायाचे रक्षक म्हणतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा निहंग शीख परंपरेशी जोडलेला एक कट्टरपंथी दक्षता गट आहे. निहंग हा शीख योद्ध्यांचा एक गट आहे. या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे गटातील लोक निळे वस्त्र, तलवारी आणि भाले, तसेच पगड्या परिधान करतात. अमृतपालच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, परंतु ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांचे इन्स्टाग्रामवर दोन अकाउंट आहेत. एका अकाउंटवर ३,५१,००० आणि दुसऱ्यावर ३,९८,००० फॉलोअर्स आहेत.
या अकाउंटवर ते अश्लील कंटेंटचा निषेध करणारे व्हिडीओ पोस्ट करतात. तसेच, त्यातून ते शीख परंपरा आणि संस्कृतीबद्दल आपले विचार मांडतात. शुक्रवारी पोस्ट केलेल्या त्यांच्या ताज्या व्हिडीओमध्ये मेहरोन यांनी धमकी देत म्हटले की, जर कंटेंट क्रिएटर दीपिका लुथरा हिने अश्लील कंटेंट पोस्ट करणे थांबवले नाही तर कौरच्या नशिबी जे आले ते तिच्या नशिबी येईल. दीपिका लुथराने माध्यमांना सांगितले की, तिने आक्षेपार्ह व्हिडीओ हटवले आहेत आणि अमृतपाल यांची माफी मागितली आहे आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची भीती आहे. तिने सांगितले की ती संरक्षण मिळवण्यासाठी पोलिसांकडे जाईल.
अमृतपाल यांच्यावर अनेक गुन्हेगारी आरोप
अमृतपाल यांच्या २०२२ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, त्यांनी मोगा येथे १२ वी पूर्ण केली आणि त्यानंतर डिझेल मेकॅनिक्समध्ये डिप्लोमा केला. प्रतिज्ञापत्रात अमृतपाल यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. २०२० मध्ये अमृतसरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात त्यांच्यावर सुवर्ण मंदिराजवळील पुतळ्यांची तोडफोड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वर्षानंतर त्यांनी बर्नाला येथे अश्लील कंटेंट पोस्ट केल्याबद्दल एका संगीत निर्मात्याला धमकी दिली होती. या प्रकरणात निमरतजीत सिंग याच्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २०२२ मध्ये त्यांनी लुधियानामध्ये राज्य काँग्रेस नेते राजा वारिंग यांना धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. वारिंग यांनी अमृतपाल मेहरोन यांच्याबरोबर खदूर साहिबचे खासदार आणि कट्टरपंथी नेते अमृतपाल सिंग यांच्या शस्त्रे दाखवत असलेल्या एका छायाचित्रावर आक्षेप घेतला होता.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या हत्येने खळबळ
कौरच्या हत्येमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. राज्य पोलिस विभागाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी तिचा कुजलेला मृतदेह भटिंडा येथील आदेश विद्यापीठाच्या पार्किंग क्षेत्रात एका कारमध्ये आढळून आला होता. एका प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कौर घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. कौरचे इन्स्टाग्रामवर ‘कमल कौर भाभी’ नावाने अकाउंट होते. त्यात तिचे ३.८७ लाख फॉलोअर्स होते. ती ‘फनी भाभी टीव्ही’ नावाची यूट्यूब चॅनेल चालवत होती, त्यात २.७ लाख सबस्क्राइबर्स होते आणि फेसबुकवर ७.७ लाख फॉलोअर्स असलेले अकाउंट होते. कौर ही मूळ उत्तर प्रदेशची असून अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये आहे. सूत्रांनी सांगितले की, आरोपींना तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून ‘कौर’ हे आडनाव काढून टाकावे अशी इच्छा होती.