BJP Brother vs brother conflict पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यातील कौटुंबिक वाद प्रत्येकाला माहीत आहे. मात्र, केवळ तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर भाजपादेखील कौटुंबिक वादामुळे अडचणीत आला आहे. भाजपाचे आमदार अन् खासदार असणाऱ्या दोन सख्ख्या भावांमध्ये सुरू असलेल्या वादाने भाजपाच्या चिंता वाढवल्या आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण? कौटुंबिक वादाने भाजपाच्या अडचणी कशा वाढवल्या? जाणून घेऊयात.

दोन सख्ख्या भावांमधील वाद

  • कोलकातापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे मतुआ दलित समुदायाचा प्रभाव आहे.
  • मात्र, या दोन भावांच्या वादामुळे हा समुदायदेखील विभागला गेल्याचे पाहायला मिळत आहे.
  • बंगावचे खासदार शंतनू ठाकूर हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये बंदर, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री आहेत. तर त्यांचे मोठे भाऊ सुब्रत हे पश्चिम बंगाल राज्यामधील गायघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
  • यापूर्वी दोन्ही भाऊ त्यांच्या मावशी व टीएमसी खासदार ममता बाला ठाकूर यांच्याशी असलेल्या वादामुळे चर्चेत आले होते; मात्र आता त्यांच्या आपापसांतील वादच चर्चेचे कारण ठरले आहे.

राज्यात लवकरच होणाऱ्या निवडणुकांसाठी म्हणून मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) केली जात आहे. त्याच मुद्द्यावरून दोन्ही भावांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. दोन्ही भावांनी ‘मतुआ कार्ड’ किंवा ‘हिंदू कार्ड/प्रमाणपत्र’ जारी करण्यासाठी दोन वेगवेगळी शिबिरे आयोजित केली आणि त्यानंतरच वाद सुरू झाला. समुदायाच्या लोकांसाठी हे प्रमाणपत्र मिळवणे, नागरिकत्व (सुधारणा) कायद्यांतर्गत नागरिकत्व सुरक्षित करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे.

१९५० पासून बांगलादेशच्या अस्तित्वापर्यंत लाखो मतुआ नागरिक प्रामुख्याने बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले आणि त्यांच्यापैकी अनेकांकडे नागरिकत्वाची कागदपत्रे नाहीत. आज राज्यात दुसरा सर्वांत मोठा दलित गट असलेल्या या समुदायाचा नागरिकत्व (सुधारणा) कायद्याला आणि त्यातून भाजपाला असलेल्या पाठिंब्यामुळेच पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकल्या होत्या. ही राज्यात संसदीय निवडणुकीतील भाजपाची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती.

वादाचे कारण काय?

मोठे बंधू आमदार सुब्रत यांनी ठाकूरवाडीसमोर एक शिबिर आयोजित केले. ठाकूरनगरमध्ये त्यांचे घर आहे आणि अखिल भारतीय मतुआ महासंघाचे मुख्यालयदेखील आहे, ज्याचे अध्यक्ष शंतनू आहेत. हे पाहून, केंद्रीय मंत्र्यांनीही त्याच ठिकाणी दुसरे शिबिर सुरू केले. प. बंगालचे खासदार शंतनू ठाकूर यांनीही आपले शिबिर जवळच्या नाट मंदिरात सुरू केले आणि त्यामुळे दोन भावांमधील वाद आणखी वाढला. नाट मंदिर मतुआ समुदायाचे धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. सुब्रत यांनी यावर आक्षेप घेतल्यावर आणि त्यांच्या मावशी ममता बाला यांना भेटल्यावर शंतनू यांनी आपल्या मोठ्या भावावर नाटक केल्याचा आणि टीएमसीमध्ये सामील होण्याचा कट रचल्याचा आरोप केला.

त्यावर सुब्रत यांनी शंतनू यांच्यावर मतुआ महासंघात खंडणी रॅकेट चालवल्याचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला. “नाट मंदिराचा अशा कामांसाठी वापर केला जाऊ शकत नाही. भाविक तिथे प्रार्थना करायला येतात. जेव्हा मी यावर आक्षेप घेतला, तेव्हा शंतनूने मला पुढील वर्षीच्या निवडणुकीत तिकीट नाकारण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करण्याची धमकी दिली,” असा आरोप सुब्रत यांनी केला. मात्र, शंतनू यांनी, मंदिराच्या जागेचा वापर समुदायाच्या कल्याणासाठी करण्यात काहीही चुकीचे नाही, असे म्हटले. “सुब्रत माझ्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंतच्या प्रगतीमुळे माझ्यावर जळतो. तो प. बंगालमध्ये भाजपा आमदार म्हणून मंत्री होऊ शकत नाही हे त्याला समजले आहे आणि त्यामुळे तो तृणमूलमध्ये सामील होऊ पाहत आहे,” असे शंतनू म्हणाले.

पालकांची भूमिका वेगवेगळी

भावांमधील या मतभेदांमुळे ठाकूर कुटुंबही विभागले गेले आहे, त्यांच्या पालकांनीही वेगवेगळी बाजू घेतली आहे. त्यांची आई छबिरानी आणि ममता बाला यांनी सुब्रतला पाठिंबा दिला आहे; तर त्यांचे वडील मंजुल कृष्णा ठाकूर यांनी शंतनू यांची बाजू घेतली आहे. त्यांचे वडील टीएमसी सरकारमध्ये माजी मंत्री होते आणि एक दशकापूर्वी ते पक्षातून बाहेर पडले होते. “ही घटना दुर्दैवी आहे. मुख्य ‘सेबायेत’ (पुजारी) म्हणून मी शंतनूला नाट मंदिरात शिबिर घेण्याची परवानगी दिली होती. सुब्रतला काही समस्या असल्यास तो कुटुंबात बोलू शकतो. त्याने यात टीएमसीला का आणले? मी ते सहन करू शकत नाही,” असे मंजुल कृष्णा म्हणाले.

राज्यात मतुआ समुदायाचा प्रभाव

राज्य सरकारचा अंदाज आहे की, मतुआ समुदाय राज्यात एकूण मतदानाच्या सुमारे १७ टक्के आहे आणि ३० विधानसभा जागांवर त्यांचा प्रभाव आहे. मतुआ समुदायाचा स्वतःचा अंदाज आहे की, राज्यात २० टक्के मतदान मतुआ समुदाय करतो आणि त्याचा ४० ते ४५ जागांवर थेट प्रभाव आहे. त्यावरून मतुआ आणि ठाकूर कुटुंब किती महत्त्वाचे आहे आणि राज्यात भाजपामध्ये खोलवर चिंतेची भावना का निर्माण झाली आहे, हे स्पष्ट होते.

सूत्रांनुसार, पक्षाने आपल्या स्थानिक नेत्यांना या वादावर सार्वजनिकपणे चर्चा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “शंतनू आणि सुब्रत दोघेही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आम्ही या कौटुंबिक वादात कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही. आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आशा करतो की, वेळ आल्यावर गोष्टी सुधारतील,” असे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.