काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी दिल्लीत दाखल झाली. दिल्लीत ‘भारत जोडो’ यात्रा पोहचल्यार अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते. अभिनेते कमल हसन यांनीही यात्रेत सहभाग नोंदवला होता. तसेच, बहुजन समाजवादी पक्षाचे खासदार श्याम सिंह यादव यांनीही ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग घेतला आहे.

उत्तरप्रदेशमधील जौनपूर मतदासंघाचे प्रतिनिधित्व करणारे श्याम सिंह यादव शनिवारी दिल्लीतील यात्रेत सहभागी झाले. यादव हे राहुल गांधींबरोबर यात्रेच्या माध्यमातून सुमारे तीन तास दिल्लीतील विविध भागात फिरले. धर्म, जात आणि राजकारणापलिकडे विविध लोकांना जोडण्यासाठी ही यात्रा असल्याचं म्हणत यादव यांनी कौतुक केलं आहे. तसेच, काँग्रसचे नेते अधीर रंजन चौधरींच्या निमंत्रणावरून यात्रेत सहभागी झाल्याचेही यादव यांनी स्पष्ट केलं. पण, यादव यांनी यात्रेत सहभागी झाल्याने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा एकत्र येणार, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना यादव यांनी सांगितलं, “अधीर रंजन चौधरी यांनी यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं नसते, तरी मी सहभागी झालो असतो. राहुल गांधींची यात्रा पक्षविरहीत आहे. संसदेत सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरींनी मला यात्रेत सहभागी होण्याबाबत निमंत्रण दिलं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाने ‘भारत जोडो’ ऐवजी ‘भारत तोडो’ यात्रा असल्याची टीका केली होती. यावर यादव यांनी सांगितलं, “भारत जोडो यात्रेच्या उद्देशांशी माझी सहमती आहे. राहुल गांधी चांगलं काम करत आहेत. यात्रेत राहुल गांधींनी खूप आदर दिला. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. यात्रेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. तसेच, आपण ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाल्याबद्दल बसपा पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला, तर त्याचं स्पष्टीकरण देण्यात येईल,” असेही यादव यांनी म्हटलं.