नवी दिल्ली : अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान गुरुवारी लोकसभेमध्ये नेमके ‘पदकवीर’ किती, हा मुद्दा गाजला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे सदस्य सुनील तटकरे भाषण करत असताना ठाकरे गटाचे सदस्य अरविंद सावंत यांनी ‘पदकवीर दोघेच’ अशी घोषणाबाजी केली. त्यावर शिंदे, फडणवीस आणि अजितदादाही पदकवीर आहेत, असे उत्तर तटकरे यांनी दिले.

‘लोकसत्ता’च्या अर्थसंकल्पावरील अंकाच्या ‘पदकवीर दोघेच’ या मथळ्याचा धागा सावंत यांनी पकडला. महाराष्ट्राला मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तटकरेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. तटकरे हे बोलताच सावंत यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. हे आरोप तटकरेंनी फेटाळाले. महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिघांनाही ‘पदके’ मिळाली आहेत, असा युक्तिवाद तटकरेंनी केला.

हेही वाचा >>>Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली?

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नाणारसारख्या रोजगारनिर्माण करणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला. केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला नाही. केंद्राने वाढवण बंदराच्या विकासासाठी निधी दिला आहे. मोदींमुळेच २२ हजार कोटींचा अटलसेतू उभा राहू शकला. महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा आभास विरोधक निर्माण करत आहेत, अशी टीकाही तटकरे यांनी केली. महाराष्ट्रातील दिग्गज नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंतदादा पाटील, ए. आर. अंतुले अशा अनेकांचा काँग्रेसने सातत्याने अपमान केल्याचा आरोपही तटकरे यांनी भाषणादरम्यान केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीतूनच बोलण्याचा पण

अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये सहभागी झालेले तटकरे यांनी मराठीतून भाषण केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी मराठीतच बोलणार असा पण केल्याचे त्यांनी जाहीर केले.