'शिक्षक'च्या निवडणुकीत संस्थाचालकांची चांदी | Candidates also gave more importance to administrators than teachers print politics news ysh 95 | Loksatta

‘शिक्षक’च्या निवडणुकीत संस्थाचालकांची चांदी

विशेष म्हणजे उमेदवारही मतदार शिक्षकांपेक्षा संस्थाचालकांना अधिक महत्त्व देत असल्याने त्यांची चांदी झाली आहे.

nagpur teacher election
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रशेखर बोबडे

नागपूर: शिक्षक, शिक्षण संस्थाचालक खरे तर गैर राजकीय घटक. सरकारही या क्षेत्राशी संबंधित निर्णय घेताना सर्वसमावेशक भूमिका घेते. दुजाभाव करत नाही. मात्र शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षक व संस्थाचालक यांची सरकार समर्थक व विरोधक राजकीय पक्षांमध्ये विभागणी झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे उमेदवारही मतदार शिक्षकांपेक्षा संस्थाचालकांना अधिक महत्त्व देत असल्याने त्यांची चांदी झाली आहे. संस्थाचालकांनी आदेश दिल्यावर संस्थेतील शिक्षक मतदान करतात हा अनुभव लक्षात घेऊनच संस्थाचालकांना पटविण्यावर भर देण्यात आला.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील तिहेरी लढत चुरशीची होणार आहे. ती शिक्षकांंपर्यत मर्यादित राहिली नाही, त्यात राजकीय पक्षांसोबत संस्था चालकांचाही शिरकाव झाला आहे. लढतीतील प्रमुख उमेदवार राजेंद्र झाडे ( शिक्षक भारती) संस्थाचालक आहेत. त्यांना पाठिंबा जाहीर करणारे कॉंग्रेसचे बंडखोर नेते आशीष देशमुख हे संस्था चालक आहेत. 

हेही वाचा >>> पदवीधर आणि शिक्षकमध्ये कोण बाजी मारणार?

शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोराव गाणार यांच्यासाठी भाजपने शुक्रवारी संस्था चालकांची बैठक घेतली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्याही शिक्षण संस्था आहेत.  संस्थाचालकांच्या माध्यमातून त्यांच्या शाळेतील शिक्षकांवर फासे टाकणे सोयीचे असल्याने उमेदवारही संस्थाचालकांना महत्त्व देत आहेत. ही संधी साधून संस्थाचालकही उखळ पांढरे करून घेत आहेत.  कोणी थकित अनुदान काढण्याची  तर कोणी अडचणीत सापडलेली शाळेची मान्यता कायम ठेवण्याच्या अटीवर उमेदवाराला पाठिंबा घोषित करू लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 09:49 IST
Next Story
पदवीधर आणि शिक्षकमध्ये कोण बाजी मारणार?