नागपूर : २०१४,२०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नितीन गडकरींना आपल्या विधानसभा मतदारसंघातून घसघशीत मताधिक्य मिळवून देणारे आणि त्यामुळेच त्यांचे ‘लाडके’ ठरलेले भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे त्यांच्या मतदारसंघातील एका उड्डाण पुलामुळे कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांची थेट गडकरींकडेच तक्रार केली. गडकरींच्या कृपेमुळेच मतदरसंघात रस्ते,उड्डाण पुलांचे जाळे विणले गेले असा दावा करणाऱ्या खोपडे यांच्यावर उड्डाण पुलाच्या बांधकामाची गडकरींकडे तक्रार करण्याची वेळ आली आहे.
नागपूरच्या भाजपच्या राजकारणात पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे हे गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्याचे कारण लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य जर कोणी देत असेल तो खोपडे यांचा पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ होय. २०१४,२०१९ आणि २०२४ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये हे दिसून आले. विशेष २०१४ ची लोकसभा निवडणूक गडकरींना सोपी गेली. पण त्यानंतर झालेल्या २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत गडकरी यांच्या तोंडाला काँग्रेसने फेस आणला होता. अशा बिकट प्रसंगात खोपडे यांनी त्यांना त्यांच्या मतदारसंघातून घसघशीत मताधिक्य मिळवून दिले. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघापेक्षा खोपडे यांच्या मतदारसंघातून गडकरींना अधिक मताधिक्य मिळते. त्यामुळे गडकरी खोपडेंवर ‘प्रसन्न’ आहेत. त्यांनी पूर्व नागपूरमध्ये अनेक विकास कामे केली. रस्ते, उड्डाण पुल, सिम्बॉयसीस सारखी शैक्षणिक संस्था सुरू केली. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे विकास कामे करतानाही गडकरी यांनी पूर्व नागपूरलाच प्राधान्य दिले. त्याचा उल्लेखही ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमात करतात. खोपडे तर त्यांच्या मतदारसंघातील सर्व कामे गडकरी यांच्यामुळेच शक्य झाल्याचा दावा करतात. अशी पार्श्वभूमी असतानाच मतदारसंघातील एका उड्डाण पुलामुळे खोपडे संतापले आहेत. तो पूल आहे पूर्व नागपुरातील हावरापेठ-कळमणा उड्डाण पुल.
उद्घाटनाशिवाय पुल सुरू
अलीकडेच हा पुल उद्घाटनाचा सोपास्कार न पाडता खुला करण्यात आला. या पुलावरून वाहतुकीची परवानगी देण्यास पोलिसांच्या वाहतूक शाखेने नकार दिला. कारण होते पुलाचे चुकलेले डिजाईन. असे असले तरी पुल बांधकामाचे श्रेय भाजपला घ्यायचेच होते. त्यामुळे लोक आग्रहाचे कारण देत यावरून वाहतूक सुरू करण्यात आली. पण पुल बांधताना झालेल्या चुकांमुळे तो भविष्यात अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार हे देनच दिवसांनी स्पष्ट झाल्यावर लोकांनी पुलाच्या विरोधात ओरड सुरू केली. त्यामुळे आमदार खोपडे संतापले व त्यांनी हा पुल बांधणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले.
अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
हावरा पेठ-कळमना उड्डाण पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी खोपडे यांनी गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. या पत्रात ते म्हणतात “ उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असताना मी अनेकदा बांधकामस्थळी गेलो होतो व अधिकाऱ्यांना डिझाईन चुकले, असे वारंवार सांगत होतो. पण अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तूविशारदाने त्याचा मेहनताना आणि पुलाचा खर्च कसा वाढेल याचाच प्रयत्न केला. पुलाच्या डिझाईनसाठी वाहतूक विभागाची परवानगी घेतली नाही. दोन्ही पुलावरील वळण अत्यंत घातक आहेत.अशा प्रकारचे चुकीचे डिझाईन आपण आतापर्यंत कधीच पाहिले नाही. या मुळे पुलावर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल खोपडे यांनी केला आहे.