दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षांतर्गत दगाफटक्यामुळे पराभूत झालेल्या चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेसाठी काँग्रेसने माजी मंत्री तथा मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २० जून २०२२ ला झालेल्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले होते. वास्तविक त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारले आणि निकालापूर्वीच १६ आमदारांसह सूरत गाठले होते. शिवसेनेतील फुटीमुळे पक्षाचा एक उमेदवार पराभूत होईल, असे चित्र होते. पण शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते.

हेही वाचा – काँग्रेसमधून फुटल्याचे बक्षीस, पण अशोक चव्हाण राज्याच्या राजकारणाच्या चाकोरीबाहेर

काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना पक्षाच्या २८ मतांचा कोटा देण्यात आला होता. १५ अतिरिक्त मतांच्या आधारे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना अपक्ष किंवा अन्य मतांची जुळवाजुळव करण्याची सूचना करण्यात आली होती. पण जगताप यांनी पक्षाच्या मतांचे गणित जुळविले. परिणामी शेवटच्या फेरीत चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. शिंदे यांचे बंड आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याने हंडोरे यांच्या पराभवाची फारशी चर्चा झाली नव्हती. पण दलित समाजातील हंडोरे यांचा पराभव दिल्लीतील नेत्यांनी गांभीर्याने घेतला होता. पक्षांतर्गत दगाबाजीने हंडोरे यांचा पराभव झाल्याचा निष्कर्ष तेव्हा काढण्यात आला होता. या पराभवाची दुरुस्ती आता करण्यात आली आहे. विधान परिषदेत पराभूत झाले तरी राज्यसभेची जागा देऊन काँग्रेस पक्षाने हंडोरे यांच्यावरील अन्याय दूर केला आहे.

हंडोरे हे मूळचे काँग्रेस पक्षाचे नाहीत. त्यांची राजकीय कारकीर्द रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षातून झाली. १९९२ मध्ये काँग्रेस आणि रिपाई आघाडीत सत्ता मिळाल्यास महापौरपद आठवले गटाला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काँग्रेसला सत्ता मिळताच रिपाईला महापौरपद देण्याचे मान्य करण्यात आले. महापौरपदासाठी दयानंद म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाली होती. पण तांत्रिक बाबीमुळे म्हस्के यांच्याऐवजी चंद्रकांत हंडोरे यांना महापौरपद मिळाले. पुढे हंडोरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००४ मध्ये चेंबूर मतदारसंघातून निवडून आलेल्या हंडोरे यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांच्याकडे सामाजिक न्याय हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले होते. मंत्रिपद भूषविताना फारसा प्रभाव ते पाडू शकले नव्हते. पुढे त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता.

हेही वाचा – नांदेड जिल्ह्यातील दोघांना खासदारकी ! ‘अपेक्षित’ अशोकराव, ‘अनपेक्षित’ डॉ. अजित गोपछेडे, पंकजा मुंडे यांच्या नावासमोर पुन्हा फुली

२०२२च्या विधान परिषद निवडणुकीत हंडोरे यांना उमेदवारीची लाॅटरी लागली. पण भाई जगताप यांनी पक्षाचीच मते स्वत:कडे वळविल्याने हंडोरे पराभूत झाले होते. यामुळे हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. भाजपने अधिकृतपणे चौथा उमेदवार उभा केलेला नाही. पण पक्षाने एखादा उमेदवार पुरस्कृत केल्यास हंडोरे यांच्यासाठी निवडून येण्याचे पुन्हा आव्हान असेल. काँग्रेस पक्षाने दलित समाजातील नेत्याला उमेदवारी देऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विशेष संदेश दिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant handore rajya sabha candidacy after defeat in vidhan sabha elections print politics news ssb
First published on: 14-02-2024 at 16:48 IST