ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कोल्हापुरात गप्पा सुरू होत्या. विषय होता त्यांना कोल्हापूर विषयी वाटणारे ममत्व, कोल्हापुरी रांगडी भाषा, इथली चविष्ट खाद्य परंपरा यावर बोलताना पवार नेहमीप्रमाणेच चांगलेच खुशीत आले होते. ते म्हणाले, ‘संधी मिळाली तेव्हा काही गावांना अगत्याने जायला आवडते. त्यात कोल्हापूर आहे. हवा चांगली आहे. तांबडा-पांढरा रस्सा चांगला मिळतो.’ या त्यांच्या टिप्पणीवर हशा पिकला. त्याहून पुढे जात त्यांनी नेत्यांच्या गाड्यांचा ताफा जाणार असल्यावर वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस इतर वाहने थांबवतात. साहजिकच इतरांना ते आवडतेच असे नव्हे. तेव्हा त्या अतिविशिष्ट वाहनातून कोण चालले आहे, हे पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची रांगडी प्रतिक्रिया कशी असते हे नोंदवताना शरद पवार थोडासा पॉज घेवून म्हणाले, ‘कोण सुक्काळीचा चाललाय त्यो!’ त्यांच्या या अचूक प्रासंगिक टिप्पणीवर मात्र सात मजली हास्य कसे असते याचा अनुभव आला.

हेही वाचा >>> ‘अजित पवारांना स्वतंत्र लढण्याचा सल्ला’; जयंत पाटील यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन् पारकट्टा रिकामा झाला…

सांगली जिल्ह्यातील एका गावच्या पारकट्ट्यावर गप्पा सुरू होत्या. नेहमीप्रमाणे गणूअण्णांना कट्ट्यावर येऊन जाणत्यांची परीक्षा घ्यायची हुक्की आलेली. यामुळे आजही त्यांनी उपस्थितांना विचारेल त्या तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर गणपती विसर्जनानंतर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी माझ्याकडून साग्रसंगीत जेवणाचा बेत. जेवण आणि तेही अपेयपानाबरोबर म्हटल्यावर सगळेजण कान टवकारून ऐकायला सरसावली. गणू अण्णांनी पहिला प्रश्न विचारला, ‘लाल चुटुक ओठ, पेरूची फोड मिळाली तर बोलतो मिठू, मिठू. सांगा पटकन मी कोण’? प्रश्न पूर्ण होण्याअगोदरच उपस्थितांनी एका सुरात सांगितले पोपट. दुसरा प्रश्न विचारला, ‘कु कू कू’ अशी भल्या पहाटे आरोळी देऊन गावाला जागे करतो, मी कोण? गणूअण्णांच्या तोंडातून प्रश्न बाहेर पडायच्या आत उत्तर आले कोंबडा, शाब्बास आता दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीत. आता तिसरा प्रश्न विचारतो, आटपाडीत गेल्यावर शिंदे शिवसेना म्हणते खासदार आमचे, तासगावमध्ये गेल्यावर राष्ट्रवादीवाले म्हणतात खासदार आमचेच. कवठ्यात गेल्यावर सरकार म्हणतात खासदार आमचेच, पलूस-कडेगाव आणि जतमध्ये गेल्यावर काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते म्हणतात खासदार आमचेच, मग खासदार नेमके कुणाचे? या प्रश्नाचे उत्तर विधानसभा निकालानंतर मिळणार असल्याने गणूअण्णांनी साग्रसंगीत मेजवाणीचा बेत रद्द केला आणि पारकट्टा रिकामा झाला. (संकलन : दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे)