छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेबरोबर युती असणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केल्याने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चलबिचल सुरू आहे. ‘एमआयएम’बरोबर युतीमध्ये असताना वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यामुळे ही विजयी जागा वंचितची असल्याचा दावा प्रवक्ते सिद्धार्थ मोळके यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २०१९ मध्ये ‘एमआयएम’च्या विजयात वंचित आघाडीचे श्रेय अधिक होते. एकूण मतदारांच्या संख्येत अनुसूचित जातीचे मतदार १६.१ टक्के तर अनुसूचित जमातीमधील ३.७ मतदार असल्याचा अभ्यास राजकीय सर्वेक्षणातून पुढे आला आहे. या टक्केवारीमध्ये नवमतदारांची भर पडली असून ही मतपेढी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दाखविलेल्या दिशेने चालेल, असा दावा केला जातो.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

एमआयएमबरोबर वंचित बहुजन आघाडीची आता युती नसल्याने हे मतदान कोठून भरुन काढायचे, असा प्रश्न एमआयएमसमोर आहे. त्यामुळेच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी अलिकडेच एका पत्रकार बैठकीमध्ये, ‘प्रकाश आंबेडकर हे आमच्यासाठी मोठे नेते आहेत. आमचे आदर्श आहेत,’ असे वक्तव्य केले होते. भाजपमधील नेतेही वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र उमेदवार असेल तर बरेच होईल, असे सांगू लागले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अलिकडेच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट होऊ शकली नाही. आता युती तुटल्याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर ही मते आपल्या बाजूने वळतील, याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये चलबिचल आहे. आता मतपेढीच्या गणितामध्ये ‘ओबीसी’ची गणिते मांडून पाहिली जात आहेत.

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयावर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘त्यांनी अजूनही महाविकास आघाडीत यावे, असे आपले मत आहे. त्यांनी असे केले नाही तर भाजपला मदत करण्यासारखे होईल. त्यांची ती भूमिका नाही, हे माहीत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा याबाबतचा निर्णय तपासून पहावा.’

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

असा आहे मतदानाचे प्रारूप

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा आतापर्यंतच्या मताचा कल होता. तसेच हिंदू- मुस्लिम असेही मतांचे विभाजन होते. औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद मध्य व या दोन मतदारसंघात मुस्लिम मतांचे शेकडा प्रमाण २१.८ टक्के असल्याचे राजकीय सर्वेक्षणातून पुढे आले होते. ही मते भाजपला मिळणार नाहीत. ती एमआयएमऐवजी उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळावीत, असे प्रयत्नही केले जात आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मते कोणत्या बाजूने वळतील, यावर नवी समीकरणे मांडली जात आहेत.