पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी काही प्रमाणात कायम राहिल्याने त्यावर उतारा म्हणून उपमुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी (५ एप्रिल) करण्यात आले आहे. इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांची नाराजी फडणवीस यांनी दूर केल्याचे बोलले जात असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर २० वर्षांपासूनचा संघर्ष आहे, असे विधान पाटील यांनी मेळाव्यापूर्वीच केल्याने पदाधिकाऱ्यांचे मनोमीलन होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीमधील महायुतीच्या उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार यांच्यासाठी बारामतीची लढाई प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या काही विधानसभा मतदारसंघात पवार यांच्याबाबत नाराजी आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असतानाच हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता यांनी पवार यांना विरोध सुरू केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महायुतीचा धर्म पाळला जात नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला होता. त्यानंतर पाटील आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. पाटील आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी सभा घेण्याचा शब्दही फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार इंदापूर शहरात शुक्रवारी ही सभा होणार आहे.
हेही वाचा >>>सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण; मॅटचा राज्य सरकारला दणका
मात्र या सभेच्या पूर्वतयारीची पाहणी पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीच्या उमेदवाराचे काम सर्वांनाच करायचे आहे. मात्र महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. स्थानिक पदाधिकारी त्यांचे प्रश्न सभेत उपस्थित करणार आहेत. राज्यातील बदलत्या राजकारणामुळे समीकरणेही बदलली आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांवर महायुतीमधील काही पक्षांकडून अन्याय होत आहे. तो दूर करण्याचे पालकत्व फडणवीस यांनी घेतले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांच्या या विधानामुळे इंदापूरमधील नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जाहीर सभेच्या माध्यमातून मनोमीलन होणार का, हा प्रश्नही कायम राहण्याची शक्यता आहे.