नागपूर : विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जवळचे आमदार कोण असा प्रश्न कोणी विचारला तर अनेक नावे पुढे येतात. त्यात निम्म्याहून अधिक नागपूरचेच निघतात. आता ओबीसींमधील मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदार कोण असा विचार केला तर त्यातही नागपूरच अग्रस्थानी ठरते, पण गोव्यात नुकत्याच झालेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात फडणवीस यांनी त्यांच्यानंतर कोणाला दुसरा मुख्यमंत्री समजतात याचे नावच जाहीर केले. त्यामुळे पक्षात स्वत:ला भाजपचा ओबीसी चेहरा म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना धक्काच बसला आहे.
राजकारणात ‘नंबर एक’, ‘नंबर -दोन’ च्या चर्चात नेहमीच होतात. भाजप किंवा संघ त्याला अपवाद नाही. संघात नंबर दोन हा नंतर नंबर एक होतो. पण याच संघटनेच्या राजकीय शाखेत म्हणजे भाजपात तसे नाही. कोणीही नंबर एक होऊ शकतो,आणि नंबर एक नंतर तोच नंबर दोनही होऊ शकतो. हे फडणवीस यांच्या निमित्ताने महाराष्ट्राने बघितले आहे.

२०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावर असताना फडणवीस यांनी नंबर दोन कोण ? याची चर्चाच होऊ दिली नाही, उलट जे या स्पर्धेत होते, त्यांना एकतर स्वत:हून बाजूला व्हावे लागले किंवा त्यांना बाजूला तरी केले गेले. आता फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची दुसरी टर्म सुरू आहे. पूर्वानुभव लक्षात घेता सरकारमध्ये मुख्यमंत्र्यानंतर कोण याची साधी चर्चाही कोणी करीत नाही. त्यामुळेच की काय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या चर्चेला तोंड फोडले. निमित्त ठरले ओबीसी महासंघाच्या अधिवेशनाचे.

काय म्हणाले मुख्यमंत्री

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोव्याच्या अधिवेशनात या संघटनेचे कर्तेधर्ते डॉ. बबनराव तायवाडे यांनी भाजपचे विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांना मंत्री करा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यावर फडणवीस म्हणाले ‘ फुके माझ्यासोबत (मुख्यमंत्र्यांसोबत) राहतात म्हणून काही जण त्यांना दुसरे मुख्यमंत्री समजतात. त्यांना मंत्री करा म्हणने म्हणजे त्यांची पदावनती करण्यासारखे होईल” मुख्यमंत्री हे मिश्किलपणे म्हणाले असले तरी हे विधान केवळ विनोद म्हणून घेतले जाऊ शकते, पण त्यातून अनेक राजकीय संकेत निघतात. त्यामुळे त्याला महत्व आहे. ज्या कार्यक्रमात फडणवीस यांनी हे विधान केले ते ओबीसींचे अधिवेशन होते.

फुके हे याच समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. शिवाय ते नागपूरचे आहेत, फडणवीस यंचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या सारखेच पक्षात ओबीसींचे अनेक नेते आहे. ते फुकेंच्या आधीपासून भाजपमध्ये सक्रिय आहे. नागपूरमध्येच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्या ऐरणीवर आला तेव्हा त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपद दिले होते. ते स्वत:ला पक्षाचा ओबीसी चेहरा मानतात. त्यांच्याकडे महत्वाचे असे महसूल खाते आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानंतर क्रमवारी द्यायची ठरली तर महसूल मंत्र्यांचा क्रमांक दुसरा लागतो. शिवाय ते ओबीसी सुद्धा आहेत. याशिवाय पक्षात आणि सरकारमध्ये अनेक ज्येष्ठ ओबीसी नेते आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेले सुतोवाच दुसऱ्या क्रमांकावर दावेदारी सांगणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या पोटात गोळा आणणारी ठरले आहे.