जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या काँग्रेसकडून उशिरा का होईना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बैठका सुरू झाल्या आहेत. मात्र, त्यात पक्ष संघटनेला बळकटी देण्यासह पुढील रणनीतीवर चर्चा करण्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच जबाबदार पदाधिकारी धन्यता मानत असल्याचे दिसून आले आहे. जळगावमध्ये आयोजित बैठकीतही पक्षाच्या राज्य सहप्रभारींसमोर पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काँग्रेसची मंडळी पराभवातून काही बोध घेतील की नाही, हा प्रश्न विचारला जात आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत रावेरसह भुसावळ आणि अमळनेरच्या जागांवर काँग्रेस उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या. प्रत्यक्षात तीनही उमेदवारांचा महायुतीपुढे अजिबात निभाव लागला नाही. पैकी अमळनेरच्या जागेवर पराभूत झालेले उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांनी काँग्रेसच्या जळगावमध्ये पार पडलेल्या जिल्हा बैठकीत राज्याचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांच्यासमोर थेट जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली. बैठकीच्या ठिकाणी सहप्रभारींसह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त बोलण्याची संधी देण्यात आल्यानंतर डॉ. शिंदे यांनीही बोलण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे संतापलेले डॉ. शिंदे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. दोघांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. समोरचा प्रकार पाहून बैठकीला उपस्थित सहप्रभारींनीही डोक्याला हात लावून घेतला.

दरम्यान, काँग्रेस सहप्रभारींना वास्तव लक्षात आणून देण्यासाठीच मी बोलण्याचा आग्रह धरला होता. परंतु, मला बोलू दिले नाही, असा आरोप डॉ. अनिल शिंदे यांनी काँग्रेसच्या बैठकीनंतर केला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार एकदाही माझ्या प्रचारासाठी अमळनेरमध्ये आले नव्हते. उलट त्यांनी मला मिळालेल्या पक्ष निधीतून दोन लाख रुपये मागून घेतले. माझ्याकडे त्याची पावती सुद्धा आहे. केंद्राने माझ्याकडे पाठवलेले प्रभारीसुद्धा पाच लाख रुपये घेऊन गेले होते. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, डॉ. शिंदे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर जिल्हाध्यक्ष पवार यांनीही आपली भूमिका मांडली. माझ्यावर केलेले पैसे मागितल्याचे आरोप चुकीचे असून, मला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. अनिल शिंदे काँग्रेसचे साधे सदस्य किंवा पदाधिकारी देखील नाहीत. असे असताना काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी बोलू देण्याचा हट्ट धरला. मूळात त्यांना अमळनेरची उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने मोठी चूक केली होती. त्यांना जेमतेम १३ हजार मते पडली. त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. आताही माझ्यावर आरोप करून त्यांचा काँग्रेसमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष पवार यांनी केला.