पुणे : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचा पुण्याचा कारभारी कोण, असा प्रश्न निर्माण झाला हाेता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आणि शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या एक वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा सांगणाऱ्या अहवालाचे प्रकाशन, तसेच मोहोळ यांनी मध्यवर्ती भागात उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पुण्याच्या कारभाराची जबाबदारी मोहोळ यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत.
गिरीश बापट हे शहराचे खासदार असताना त्यांच्याकडे भाजपने कारभारी पदाची सूत्रे सोपविली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर भाजपने अद्याप जाहीरपणे पुण्याचा कारभार कोणाकडेही सोपविलेला दिसत नाही. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणेकरांच्या प्रश्नांबाबत गेल्या महिन्यात बैठका घेतल्या. त्यामुळे पुण्याचा कारभारी कोण, यावरून भाजपमध्ये शीतयुद्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन दिवसांपूर्वी मोहोळ यांनी घेतलेल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोहोळ यांचे काम चांगले असल्याची पावती दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. मोहोळ यांनी या कार्यक्रमासाठी भाजपमधील सर्व आमदार, महायुतीतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष यांनाही निमंत्रित केले होते. शहरातील विविध भागांतील नागरिकदेखील आवर्जून उपस्थित होते.
खासदार मोहोळ यांनी २४ तास जनसंपर्क कार्यालय सुरू ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कार्यालयाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील नागरिक त्यांच्याशी जोडले जाणार आहेत. याचा फायदा भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार आहे. भाजपचे शहर कार्यालयही आहे. मात्र, त्या कार्यालयात या सुविधा सुरू करण्याऐवजी मोहोळ यांच्या कार्यालयातून या सेवा दिल्या जाणार आहेत. मोहोळ यांनी घेतलेला कार्यक्रम आणि त्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता शहराचे कारभारी हे मुरलीधर मोहोळ हेच असतील, अशी जोरदार चर्चा भाजपसह इतर पक्षांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना माजी राज्यमंत्री आणि खासदार असलेल्या सुरेश कलमाडी यांच्याकडे पुण्याचे कारभारीपद होते. महापालिकेपासून ते केंद्रापर्यंत कलमाडी यांनी शहराचे कारभारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, दिवंगत खासदार गिरीश बापट हे पालकमंत्री असताना त्यांनी पुण्याचा कारभार पाहिला होता. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आल्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री झाले. आता मोहोळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मोहोळांचे पुण्याकडे लक्ष
महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, खासदार, त्यानंतर केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाल्याने मोहोळ यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले आहे. त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक आणि सहकार या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आल्याने देशभरातील विविध भागांत त्यांचे दौरे वाढले. केंद्रात मंत्रिपद मिळाले असले, तरी पुणे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता स्थानिक प्रश्नांकडेदेखील लक्ष देण्यास मोहोळ यांनी सुरुवात केली. शहरवासीयांना भेडसावणाऱ्या रस्त्यावरील खड्डे, पावसाळी गटारे, बेकायदा जाहिरातफलक, अपुरा पाणीपुरवठा या प्रश्नांबाबत केंद्रीय राज्यमंत्री असलेले मोहोळ हे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना करत होते.