मुंबई : मंत्रीपद मिळाल्यानंतर पदभार स्वीकारणे आणि मतदारसंघात सत्कार समारंभ व मिरवणुकांमध्ये अनेक मंत्री दंग असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कामाला लागले आहेत. प्रत्येक खात्याने १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दिले असून या आराखड्याची आढावा व छाननी करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच प्रत्येक खात्याला १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतर दोन आठवड्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झाल्यावर खातेवाटप झाले. त्यामुळे अनेक मंत्र्यांनी मुंबईत येवून मंत्रालयातील दालनात पदभार स्वीकारणे आणि खात्याची आढावा बैठक घेण्याचे काम सुरु झाले आहे.

पण बहुसंख्य मंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनांचे नूतनीकरणाचे काम सुरु असल्याने फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरुनच बैठका व कामकाज सुरु केले आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन सुमारे तीन आठवडे होत आल्याने त्यांनी मंत्र्यांची वाट न पाहता प्रत्येक खात्याच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्याचे काम सुरु केले आहे.

होही वाचा…कृती आराखड्यासाठी मुख्यमंत्री आग्रही; प्रत्येक खात्याला १०० दिवसांचे ठोस नियोजन करण्याचे निर्देश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री हा त्या खात्याचा प्रमुख असतो. पहिल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात कोणत्या योजना व कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, कोणते निर्णय घेतले जावेत, आदी बाबींवर मंत्र्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेक मंत्री मतदारसंघात सत्कार समारंभ, मिरवणुका व अन्य बाबींमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी प्रत्येक खात्याच्या सचिवांना पाचारण करुन कृती आराखड्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी आतापर्यंत सहा खात्यांच्या आढावा बैठका घेतल्या असून कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, वन खात्याची बैठक गुरुवारी घेतली. मात्र त्यास संबंधित खात्यांचे मंत्री उपस्थित नव्हते, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. या खात्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी कृती आराखड्याचे सादरीकरण फडणवीस यांच्यापुढे केले. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री वेगाने बैठका व निर्णय असून पहिल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीकडे मंत्र्यांचे मात्र फारसे लक्ष नसल्याचे चित्र आहे.