केरळमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे राज्य सचिव आणि पॉलिटब्युरोचे सदस्य एम.व्ही.गोविंदन एका फोटोमुळे अडचणीत सापडले आहेत. प्रसिद्ध अशा ज्योतिषाबरोबर गोविंदन यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शास्त्रीय पद्धतींचा अंगीकार हे कम्युनिस्ट पक्षाचं धोरण राहिलं आहे. ज्योतिषी, भविष्य या गोष्टींशी संलग्न झालेल्या नेत्यांवर कारवाई झाली होती.
पक्षाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. पक्षाचे काही नेते अहमहमिकेने ज्योतिषांची भेट घेत असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट झालं होतं. पक्षाच्या धोरणाला विसंगत अशा वागण्यामुळे ज्योतिषांची भेट घेणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

कन्नूरस्थित प्रसिद्ध ज्योतिषी माधवा पोडूवल यांच्याबरोबरचे गोविंदन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्योतिषांची भेट घेतल्याबद्दल पक्षातल्या लोकांनी गुरुवारच्या बैठकीत टीका केली या वृत्ताचं गोविंदन यांनी खंडन केलं. अशी कोणतीही टीका झाली नाही असं गोविंदन म्हणाले.

दरम्यान पोडूवाल यांनी गोविंदन यांच्याशी अनेक वर्ष सौहार्दपूर्ण संबंध असल्याचं म्हटलं आहे. गोविंदन यांनी आधीही माझी भेट घेतली आहे मात्र त्यांनी माझी भेट ज्योतिषी म्हणून घेतली नव्हती.

‘गोविंदन यांनी कुटुंबीयांसह माझी भेट घेतली. मी त्यांना अनेक वर्ष ओळखत आहे. शस्त्रक्रियेनंतर बरं होत असताना ते मला भेटायला आले होते. ज्योतिषी म्हणून ते मला भेटायला आले नव्हते. ते विचारपूस करायला आले होते. तेव्हा कोणीतरी फोटो काढला’, असं पोडूवाल यांनी कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर इथे बोलताना सांगितलं.

केरळ यात्रेदरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याबरोबर न्याहरी केल्याचंही पोडूवल यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी केरळचा राज्यव्यापी दौरा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची भेट झाली असंही पोडूवल यांनी सांगितलं.

ज्योतिषी पोडूवल यांच्याशी झालेली भेट वादाचा मुद्दा नसल्याचं गोविंदन यांनी सांगितलं. पक्षाचे ज्येष्ठ नेते ए.के. बालन यांनी गोविंदन यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

‘कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी ज्योतिषांची भेट घेण्यात काहीच वावगं नाही. ज्योतिषांची भेट घेणं किंवा त्यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध असणं याचा अर्थ त्यांच्या विचारधारेशी सहमत होणं असा होत नाही. ज्योतिषांना भेटण्यात वादग्रस्त असं काहीच नाही. एखाद्या कार्यक्रमासाठी मुहुर्त शोधण्याकरता गोविंदन पोडूवल यांना भेटले नाहीत. कम्युनिस्ट पक्षातील आम्ही सगळेच शास्त्रीय तत्वाने वागणारे आहोत’, असं बालन म्हणाले.

२०२१ मध्ये गोविंदन पक्षाचे सेंट्रल कमिटीचे सदस्य होते. कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या शास्त्रीय तत्वांचा अवलंब करणे भारतीय मूल्यव्यवस्थेत, संस्कृतीत व्यवहार्य नसल्याचं गोविंदन यांनी म्हटलं होतं. कम्युनिस्ट पक्षाने आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही विचारसरणीच्या लोकांना पक्षात स्थान द्यायला हवं.

कम्युनिस्ट पक्षाने ज्योतिष तसंच ज्योतिषांची विचारसरणी मानणाऱ्या नेत्यांवर आक्षेप नोंदवला होता. शास्त्रोक्त विचारसरणी हे पक्षाचं धोरण आहे. २००८ मध्ये सीपीएमचे खासदार एपी अब्दुलाकुट्टी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. भविष्य विचारधारेतील नाडी या संकल्पनेचा आधार घेतल्याप्रकरणी अब्दुलाकुट्टी चर्चेत आले होते. या प्रकरणामुळे अब्दुलाकुट्टी पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला झाले. काही महिन्यातच ते पक्षातून बाहेर पडले. ते भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी एक आहेत.