परभणी: राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांचे नाव असलेला टेम्पो पुसद येथे पोलिसांनी पकडल्यानंतर त्यावर आता जिल्ह्यात राजकारण सुरू झाले असून नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार विजय भांबळे यांनी या प्रकरणी बोर्डीकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या टेम्पोच्या माध्यमातून पुण्याहून नागपूरला अधिकृत खरेदीदाराकडे विदेशी दारूचा साठा नेला जात होता. मात्र ही दारू बनावट असल्याचा आरोपही भांबळे यांनी केला आहे. यावर भांबळे यांच्या आरोपाला भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी उत्तर दिले असून या निमित्ताने मित्रपक्षात आल्यानंतरही बोर्डीकर- भांबळे यांच्यातील पारंपारिक संघर्ष पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आपल्या नातेवाईकाचे पुण्यात वाहतूक व्यवसाय आहे व त्यांच्याकडे अनेक वाहने आहेत. अनेक कंपन्यांच्या वाहतूकीची कंत्राटे त्यांच्याकडे आहेत. नातेवाईकाच्या वाहतूक गाडीतून अधिकृत असा विदेशी दारुचा साठा नागपुरला अधिकृत खरेदीदाराकडे जात होता. त्या टेम्पोला जीपीएस यंत्रणा होती. हा टेम्पो नातेवाईकांना नागपुर ऐवजी अन्यत्र जात असल्याचा संशय आला तेव्हा लगेचच पुसद येथील मित्रांकरवी नातेवाईकांनी पोलिसांच्या मदतीने हे वाहन शोधले तेव्हा ट्रकचालकाचा गैर हेतू लक्षात आला, असे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रीतसर खुलासा केल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतरही भांबळे यांनी या प्रकरणात पालकमंत्री बोर्डीकर यांच्यावर आरोप केले आहेत. हा विदेशी दारूचा साठा बनावट असून त्याची चौकशी करण्यात यावी तसेच पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने जिंतूर तालुक्यात गुटखा, वाळू यासारखे धंदे चालत असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भांबळे यांनी केली आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भांबळे यांना उत्तर दिले आहे. नैतिकतेच्या गोष्टी आमच्या समोर करू नयेत. जनतेची दिशाभूल करून धूळफेक करत आमच्या नेतृत्वावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा त्याच भाषेत उत्तर देऊ. युतीचे मित्र पक्ष आहात तर मित्र पक्षासारखे वागा अन्यथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देतील अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी दिली आहे. काल परवा तुमच्या पक्षात आलेल्यांनी आमच्या नेतृत्वावर टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला समज द्या असेही भुमरे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना उद्देशून म्हणाले आहेत.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून बोर्डीकर विरुद्ध भांबळे असा टोकाचा संघर्ष आहे. काही दिवसांपूर्वीच भांबळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजीत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. बदललेल्या या समीकरणात बोर्डीकर- भांबळे असा संघर्ष कायम राहणार काय याबाबत औत्सुक्य होते, मात्र पक्षांतरानंतरही भांबळे यांनी आपला बोर्डीकर विरोध सुरूच ठेवला आहे. हे या निमित्ताने दिसून आले.
काय आहे मूळ प्रकरण ?
अशोक लेलॅन्ड या कंपनीच्या एम.एच.१२ वाय.बी. ००४८ या टेम्पोला गुरुवारी (दि.२४) पुसद जवळ पोलिसांनी माहुर ते मोहा या रस्त्यावर ताब्यात घेतले. तेव्हा टेम्पो चालक मनिष ईश्वर सुरुळे (रा. डोके सावंगी कारेगाव ता. शिरुर) हा त्या टेम्पोतील विदेशी दारुची विक्री करीत होता. पुसद पोलिसांनी याप्रकरणी सात व्यक्तींना टेम्पोसह तीन मोटारसायकल व मोबाईलसह ताब्यात घेतले. एकूण ६४ लाख ७२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व ७ आरोपींविरुध्द पुसद शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे की हा टेम्पो हडपसर येथील एमआयडीसीतून दारुचा साठा घेऊन सरळ नागपुरला जाणे अपेक्षित असताना चालकाने हे वाहन पुसद जवळ आणून त्यामधील विदेशी दारु अन्य सहा आरोपींना अवैधरीत्या विक्री करताना आढळून आला. त्या विदेशी दारुचा मुद्देमाल हा कायदेशीररीत्या बिल व इनोव्हाईस नुसार शासकीय कर भरणा केलेला होता. ‘राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर’ असे नाव लिहिलेल्या त्या टेम्पोच्या प्रकरणाचा मंत्री महोदयांशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण पुसद पोलिसांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.