सावंतवाडी — रायगड रत्नागिरी पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीत धुसफुस आणि कुरघोड्यांचे राजकारण पाहायला मिळाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र याला होता. पण आता इथेही भाजप आणि शिवसेनेत विसंवाद आणि मतभेद दिसण्यास सुरुवात झाली आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात जोरदार संघर्ष पेटला असून, भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे.

महायुतीतील दोन्ही पक्षांमधील या संघर्षाचे मुख्य कारण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली पळवापळवी आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब आणि दत्ता सामंत यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्यासाठी निरनिराळी प्रलोभन दाखवत असल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कुडाळ सावंतवाडी आणि मालवण येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून केला जात असल्याचा या तक्रारीत म्हटलं आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमधील बेबनाव प्रकर्षाने समोर आला आहे. मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेतात याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. कधी जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपावरून तर कधी एकमेकांचे कार्यकर्ते पळवण्यावरून दोन्ही पक्षातील वाघ समोर येत आहेत.

यावर संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचा भाजप कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास विरोध असल्याचं म्हटलं आहे. तर दत्ता सामंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपमध्ये काम केल्याने कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबंध असल्याचा दावा केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे सरचिटणीस महेश सारंग यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे की, त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन दाखवावं, कारण भाजपची संघटना बूथ स्तरावर मजबूत आहे.

हे आव्हान संजू परब यांनी स्विकारत सारंग यांच्या कोलगाव या होम पिचवर भाजपचे चार ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सांगितले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक आता कार्यकर्ते पळवापळवी मध्ये होईल अशी शक्यता आहे.

सध्या जिल्हा पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादावर राज्यातील वरिष्ठ नेते, म्हणजेच प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, या सर्व घडामोडी पाहता, दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे महायुतीमध्ये फूट पडणार का? या शाब्दिक आरोप – प्रत्यारोपांचा परिणाम आगामी निवडणुकांवर का? औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आम्ही प्रामाणिकपणे काम केले. मात्र निवडणुकीनंतर शिवसेना कडून आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकार थांबायला हवेत यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना पत्र लिहून वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. हे प्रकार थांबले नाही तर भाजपला स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार करावा लागेल. – प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष भाजपा