मोहन अटाळकर

अमरावती : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ पदयात्रेची सांगता झाल्यानंतर ‘हात से हात जोडो’ अभियान सुरू करण्यात आले. पश्चिम विदर्भात ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नेत्यांमध्ये ही ऊर्जा कायम ठेवण्यासाठी पक्षातर्फे नवे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले गेले. महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार हे अनिश्चित असले, तरी त्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

हेही वाचा >>>महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीसाठी के कविता आक्रमक, दिल्लीतील बैठकीला १२ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित

एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम विदर्भात पक्षाची ताकद क्षीण होत गेली. सध्या काँग्रेसचे अमरावती विभागात पाच आमदार आहेत, त्यातील तीन अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील पक्षाची पकड टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसमोर आहे. राज्यात सत्तांतरानंतर परिस्थिती बदलली आहे. पक्षातील अंतर्गत कलहातून वाट काढत काँग्रेसला ‘हात से हात जोडो’ अभियान राबवावे लागत आहे.

अमरावती जिल्ह्यात २६ जानेवारी २०२२ पासून हे अभियान सुरू होणार होते, मात्र वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार १४ मार्चपासून अमरावतीत या अभियानाचा शुभारंभ झाला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पश्चिम विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून गेली. दरम्यानच्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. हा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी व खासदार राहुल गांधी यांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी राज्यातील काँग्रेसचे काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

गाव पातळी, ब्लॉक पातळीपासून तर तालुका व जिल्हा स्तरावर समांतर पद्धतीने स्थानिक नेते व पदाधिकारी याचे आयोजन करीत आहे. यात प्रभात फेऱ्या, पदयात्रा, बैठका, सभा यांचा समावेश आहे. या माध्यमातून मतदारांच्या दारावर पोहोचण्याचा काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे; पण कोणत्याही निवडणुकीविना कार्यकर्त्यांना गोळा करणे, हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी जिकिरीचे काम बनले आहे.

हेही वाचा >>>काँग्रेसच्या आघाडीमध्ये जाण्यात रस नाही; भाजपाविरोधी आघाडीसाठी ‘सपा’ने मांडली वेगळी चूल

महापालिका निवडणूक केव्हा होणार, हे अजूनही स्पष्ट होत नसल्याने इच्छुक उमेदवार अस्वस्थ आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. सण, उत्सवांमधून कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. सत्ताधारी पक्षांसोबत दोन हात करण्याची व्यूहरचना आखण्याचे कामही केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि माजी राज्यमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, दर्यापूरचे बळवंत वानखडे, मलकापूरचे राजेश एकडे आणि रिसोडचे आमदार अमित झनक हे काँग्रेस कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे, अमरावतीत माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचाही गट सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भात ही यात्रा पक्षात नवीन ऊर्जा संचार करू शकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.