सांगली : आघाडीच्या राजकारणात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या सांगलीचा सलग दुसर्‍यांदा बळी गेला आहे. मोदी लाटेत पराभव झाल्यानंतर २०१९ मध्ये आघाडीत स्वाभिमानीला सांगलीची जागा हातउसन्या उमेदवारासोबत देण्यात आली, आता मात्र त्या पुढचा टप्पा म्हणजे ठाकरे शिवसेनेला जागा देत असतान आठ दिवसांपूर्वी शिवबंधन हाती बांधलेल्या चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. यामुळे सांगलीवर दावा सांगणार्‍या काँग्रेसचे आणि वसंतदादा घराण्याचे सार्वजनिक राजकारणात भवितव्य काय हा प्रश्‍न पुसला जात आहे.

मोदी लाटेमध्ये २०१४ मध्ये दादा घराण्यातील ज्येष्ठ वारसदार तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील पराभूत झाल्यानंतर गेल्यावेळीही आघाडीच्या खेळात अखेरच्या क्षणी काँग्रेसला सांगलीच्या जागेवर पाणी सोडावे लागले होते. तीच स्थिती यावेळीही निर्माण झाली आहे. मात्र, गत निवडणुकीत काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देत असताना विशाल पाटील यांच्या रुपाने हातउसना उमेदवारही दिला होता. मात्र चिन्हबदल झाल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी याकडे कानाडोळा तर केलाच पण वंचित बहुजन आघाडीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे पराभवही पदरी पडला.

हेही वाचा – नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भारधाव ट्रकची धडक

यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. अखेरच्या टप्प्यात धावपळ होऊ नये यासाठी काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी एकीकडे प्रयत्न सुरूच ठेवले असताना सामाजिक कार्यातही टीम विशाल राबत होती. करोना काळ असो वा महापूर असो अडचणीच्या काळात टीम विशाल सांगलीकरांच्यासाठी रस्त्यावर होती. ही लोकसभेची पूर्वतयारीच होती. सहा महिन्यांपूर्वी आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जतपासून पदयात्रा काढून वातावरण निर्मिती करत असताना काँग्रेसचे चिन्ह पुन्हा घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने कडेगाव-पलूस मतदारसंघात मेळावा घेऊन डॉ. कदम यांनी सक्रिय असल्याचे दाखवले होते. याचा निश्‍चितपणे लाभ लोकसभा निवडणुकीत उठविण्याचे नियोजन होते. मात्र, आघाडीच्या राजकारणात ठाकरे शिवसेनेपुढे काँग्रेसच्या ज्येष्ठांसह सर्वांनाच नमते घ्यावे लागले. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नैराश्य पसरले असून यातूनच आमचे काय चुकले ही टॅगलाईन समाजमाध्यमांच्या भिंती रंगवत आहे.

गेल्यावेळी ज्या पद्धतीने आघाडीच्या राजकारणात काँग्रेसच्या सांगलीच्या जागेचा बळी घेतला तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक वेदनादायी बळी गेला आहे. आता यावर उतारा ठरतो तो लाथ मारून लोकसभेचा बंद केलेला दरवाजा तोडण्याचा. असा प्रयोग स्व. मदन पाटील यांनी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केला होता. ‘मै हूँ ना’ ही टॅगलाईन वापरून अपक्ष मैदानात उतरून त्यांनी आमदारकी मिळवली होती. आताही तोच पॅटर्न राबवण्याचा दबाव दादा घराण्यावर आहे. आमचं काय चुकलं असे म्हणत जनतेच्या कोर्टात जाण्याचा सल्ला समाजमाध्यमातून काँग्रेसला दिला जात आहे.

हेही वाचा – “विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल

पक्षीय पातळीवर जर दादा घराण्याला आता गप्प बसवले तर चार महिन्यानंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीच्या शर्यतीत विशाल पाटील हेही इच्छुकांच्या यादीत असणार आणि हा धोका काही नेत्यांना वाटतो आहे. यातूनच कोणत्याही स्थितीत दादा घराणे या लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात हवेच अशी भूमिका घेतली जात असावी अशीही शंका वर्तवली जात आहे.

सांगलीत काँग्रेस आता काय भूमिका घेणार याकडे केवळ सामान्य कार्यकर्त्यांचेच लक्ष आहे असे नव्हे तर भाजपचेही या हालचालीकडे लक्ष आहे. यदाकदाचित वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर प्रकाश शेंडगे मैदानात ताकदीने उतरले तरच भाजपचा मार्ग सुकर होऊ शकतो अन्यथा, काटा लढतीचा तणाव दोघांवरही अखेरपर्यंत राहणार आहे. त्या दिशेनेच काँग्रेसची वाटचाल सध्या दिसत आहे. ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव कायम ठेवण्यासाठी एक अपक्ष व एक काँग्रेस असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे प्रयत्न होतील. अखेरच्या क्षणी काँग्रेस श्रेष्ठींनी अनुकूलता दर्शवली तर हात अन्यथा, कपबशी चिन्हाला प्राधान्य देऊन मैदानात उतरण्याची तयारीही ठेवली जाईल. मात्र, यासाठी डॉ. कदम यांची सहमती आवश्यक मानली जाणार आहे.