पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अखेर जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच पटेरिया म्हणाले की, यातून त्यांना एक मोठा धडा मिळाला आहे. राजा पटेरिया यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतकांना सावध करताना सांगितले की, यापुढे कोणतेही विधान करताना काळजी घ्या. असे काही बोलू नका, ज्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजा पटेरिया यांचा मागच्या वर्षी १३ डिसेंबर रोजी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते पवई नावाच्या गावात बैठकीत बोलत असल्याचे दिसत होते. या बैठकीत ते म्हणाले, “मोदी निवडणूक प्रक्रिया संपवून टाकतील. ते धर्म, जाती, भाषा याआधारावर विभागणी करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भविष्य धोक्यात येईल. संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा. हत्या म्हणजेच मोदींचा पराभव करा…”

काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी जामिनावर मुक्त केले. पोलिसांनी सांगितले की, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना पटेरिया म्हणाले, “मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करून मला तुरुंगात धाडणाऱ्या भाजपाच्या राज्य सरकारचा मी निषेध करतो. न्यायव्यवस्था दोषी नसून भाजपा दोषी आहे.”

आपल्या वादग्रस्त विधानावर सविस्तर भूमिका मांडताना पटेरिया म्हणाले, “मी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करतो, म्हणून भाजपा मला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जातिव्यवस्थेच्या विरोधात आहे. भाजपा पक्ष गोडसे, सावरकर आणि गोळवलकर यांच्या तत्त्वांना मानणारा आहे. मी संविधान आणि देशातील आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याबाबत बोललो होतो.”

भाजपावर हल्ला करताना पटेरिया म्हणाले की, माझ्यासारख्या अनेक लोकांना तुरुंगात डांबले आहे. माझा प्रश्न आहे भाजपाला. त्यांचे नेते खुलेआम हिंदू राष्ट्र करण्याबाबत विधान करतात. त्यांना का नाही अटक केली जात. हे असंवधानिक नाही का? हे लोक धर्माचा गैरवापर करतात आणि साधूंद्वारे वादग्रस्त वक्तव्य करतात. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही? मी शिवराज सरकारच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करत असल्यामुळे माझ्यावर सरकार नाराज आहे. मला घाबरविण्यासाठी त्यांनी तुरुंगात पाठविले, असा आरोप पटेरिया यांनी केला.

पटेरिया यांनी तुरुंगात ८० दिवस काय केले?

पटेरिया तुरुंगात दोन महिन्यांहून अधिक काळ होते. तुरुंगात काय केले असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सकाळी लवकर उठणे, दिवसभर वॉक करणे, शशि थरूर यांची ‘व्हाय आय एम अ हिंदू’ आणि अरुंधती रॉय यांच्या पुस्तकांचे वाचन केले. तसेच इतर कैद्यांप्रमाणेच मी झाडू मारला. ते खायचे तेच जेवण घेतले. मला अन्य कैद्यांविषयी वाईट वाटते. बऱ्याच लोकांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. मी त्यांना मदत करू इच्छितो, तुरुंगात सुधार आणण्यासाठी मी यापुढे काम करेन.

राजा पटेरिया यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल

काँग्रेस नेता राजा पटेरिया यांना अटक केल्यानंतर पन्ना जिल्ह्यातील पवई तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ४५१, ५०४, ५०५, ५०६, ११५, ११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेरिया यांचे वकील शशांक शेखर यांनी सांगितले की, या प्रकरणात माझ्या अशिलावर लावलेली कलमे गैरलागू आहेत. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर कायद्याने त्याला शिक्षा द्यावी, लोकशाहीत स्वातंत्र्याला फार महत्त्व आहे. पण एखाद्या व्यक्तीने कोणताही गुन्हा केलेला नसताना त्याला ८० दिवस तुरुंगात ठेवणे चूक आहे. आता वेळ आली आहे की, आपण सर्वांनी यावर विचार करायला हवा. ही कारवाई लोकशाहीवर एक मोठे प्रश्न निर्माण करते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader raja pateria released from jail after 80 days gave offensive statement against pm narendra modi kvg
First published on: 09-03-2023 at 19:29 IST