संगमनेर : महाविकास आघाडी कडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून ‘ वंचित ‘ मध्ये प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असून त्यामुळे या मतदारसंघातील सगळी गणिते बदलणार आहेत. रुपवते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या निकटवर्तीय असल्याने थोरात यांनाही हा धक्का मानला जातो.

रुपवते या राज्य महिला आयोगाच्या सदस्य तसेच काँग्रेसच्या महासचिव होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवल्यानंतर लगेचच त्यांनी अकोला येथे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचितमध्ये प्रवेश केला. शिर्डी मतदारसंघातून वंचितकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रुपवते वंचितच्या उमेदवार असल्यास या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार असून त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे.

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
ramdas athawale marathi news
Video: “गावागावात विचारत आहेत म्हातारी, शरद पवार…”, रामदास आठवलेंची तुफान टोलेबाजी; फडणवीसांनी लावला डोक्याला हात!

हेही वाचा – ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?

महाविकास आघाडीकडून विशेषतः काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी रूपवते इच्छुक होत्या. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली. शिवसेनेकडून या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना पक्ष बदलाची मोठी पार्श्वभूमी आहे. शिवसेनेचे खासदार असलेले वाकचौरे यांनी नंतर सोडत काँग्रेसची उमेदवारी मिळवली, मात्र त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर ते भाजपात गेले आणि आता पुन्हा ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. लोखंडे यांनी देखील भाजपा, मनसे, मूळ शिवसेना आणि त्यानंतर शिंदे शिवसेना असा प्रवास केलेला आहे. वाकचौरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर मतदारसंघात शिवसैनिकांत मोठा उद्रेक झाला होता. त्याचा परिणाम वाकचौरे यांना मारहाण होण्यापर्यंत झाला. त्यावेळी झालेल्या पोलीस केसेस शिवसैनिक अजूनही लढत आहेत.

साहजिकच तत्कालीन शिवसैनिकांमध्ये वाकचौरे यांच्या उमेदवारीविषयी नाराजी आहे. लोखंडे यांनीही मूळ शिवसेना सोडल्याने या दोघांकडेही गद्दार म्हणूनच शिवसैनिक बघतात. एकूणच मतदारसंघात देखील या दोघांच्या उमेदवारीबाबत फारसा उत्साह दिसून येत नाही. अशातच रुपवते या लढ्यात उतरल्यास तिरंगी लढत अटळ आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रूपवते यांचे वडील प्रेमानंद रूपवते यांचीही अशीच कोंडी झाली होती. त्यावेळी त्यांनीही काँग्रेसचा त्याग करत अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना केवळ सुमारे २३ हजार मते मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अपक्ष न लढता वंचितच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय उत्कर्षा रूपवते यांनी घेतला असावा. मात्र हा निर्णय कितपत फलदायी होतो हे आगामी काळातच दिसून येईल. मतदारसंघातील काँग्रेसचे नेते कार्यकर्ते त्यांना कितपत मदत करतात यावरही बरीच गणिते अवलंबून असतील.

हेही वाचा – जाट समाजाची भाजपावर नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर?

कोण आहेत रुपवते ?

काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री दादासाहेब रुपवते आणि माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांची नात, दिवंगत काँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते व स्नेहजाताई रुपवते यांच्या उत्कर्षा या कन्या आहेत. दादासाहेब रुपवते यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांच्या जिल्ह्यात अनेक शाखा आहेत. त्याचा कारभारही उत्कर्षा रूपवते सांभाळतात.