scorecardresearch

पटोले-थोरात वादाची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, प्रभारी एच. के. पाटील यांना पाचारण

बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामध्ये समेट घडवून आणला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबईत प्रभारी एच. के. पाटील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे.

Congress Maharashtra, incharge, H K Patil, Mumbai, Balasaheb Thorat, Nana Patole
पटोले-थोरात वादाची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, प्रभारी एच. के. पाटील यांना पाचारण ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

महेश सरलष्कर

काँग्रेसचे ज्येष्ठे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेनंतर, प्रदेश काँग्रेसमधील बेबनावाची गंभीर दखल दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांना तातडीने दिल्लीत दाखल होण्यास सांगण्यात आले असून पाटील मंगळवारी संध्याकाळपर्यंत राजधानीत पोहोचतील.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काम करणे अशक्य असून आपण विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र झाला आहे. ‘प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी पाठवलेल्या पत्रांतील तक्रारींची माहिती पक्षश्रेष्ठींना आहे. पक्षांतर्गत वाद मिटवला जाईल’, असे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. थोरात यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याची शक्यता नसली तरी चव्हाट्यावर आलेला पक्षांतर्गत वाद मिटवावा लागणार आहे.

हेही वाचा… राज्य काँग्रेसमधील संघर्षाला जबाबदार कोण ?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनीही पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते व पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, देशमुख यांच्या पत्रावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याने पत्राद्वारे पटोले यांची तक्रार केल्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना तातडीने दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळेच प्रभारी एच. के. पाटील यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच, संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर एच. के. पाटील मुंबईला रवाना होण्याची शक्यता आहे. प्रदेश कार्यकारणीची १० फेब्रुवारी रोजी मुंबईत बैठक होणार असल्याने पाटील याचा राज्यातील दौरा निश्चित झाला होता. मात्र, प्रदेश काँग्रेसमधील वाद उग्र झाल्याने पाटील यांना पूर्व नियोजित दौऱ्याआधीच मुंबईत दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… शिंदे गटाच्या मंत्र्याच्या विरोधात भाजप आक्रमक

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवार निवडीवरून झालेल्या घोळानंतर सत्यजित तांबे व त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पक्षाने निलंबित केले. या घोळाचे खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या डोक्यावर फोडले गेले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधातील पक्षांतर्गत मोहीम आणखी तीव्र झाली होती. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पटोले यांच्या कार्यपद्धीवर काही आक्षेप असले तरी, राहुल गांधी व त्यांच्या निष्ठावान नेत्यांचा अजूनही पटोले यांना पाठिंबा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात व नाना पटोले यांच्यामध्ये समेट घडवून आणला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबईत प्रभारी एच. के. पाटील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:29 IST
ताज्या बातम्या