छत्रपती संभाजीनगर : योजनांच्या निधीचे श्रेय घेत आपली प्रतिमा अधिक लोकाभिमूख आहे, असे दाखविण्याचे प्रयत्न लातूरचे आमदार अमित देशमुख करत आहेत. याच काळात भाजपच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी शिवाजी पाटील कव्हेकर यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनीही आपणच आमदार देशमुख यांचे खरे विरोधक आहोत, असे दिसते असावे म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. लातूरमध्ये मधील कॉग्रेस व भाजपमधील कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्यामागे ही कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दोन निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहचलेल्या अमित देशमुखांना यावेळेसच्या निवडणूकीत विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झगडावे लागले. अवघ्या सात हजार मतांनी झालेल्या विजयानंतर एरवी लोकांपासून अंतर ठेवून राहणारे अमित देशमुख निकालानंतर आता आपण ‘जमिनीवरचे’ नेते आहोत हे दाखवण्यासाठी पळापळ करीत आहेत.
विलासराव देशमुख या लोकाभिमुख नेत्याचे राजकीय वारसदार असलेल्या अमित देशमुखांची ओळख ‘लोकांपासून अंतर राखून असणारा नेता’ अशी आहे. बाहेरच्याच नव्हे तर मतदारसंघातील लोकांशीही ते फटकून वागतात, त्यांच्यात मिसळत नाहीत असा शिक्का त्यांच्यावर बसला आहे. विलासरावांच्या हयातीत झालेल्या २००९ तसेच २०१४ व २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत अनुक्रमे ८९४८०, ४९४६५ व ४०४१५ हजारांचे मताधिक्य घेऊन विधानसभेत पोहचलेले अमित देशमुख २०२४ मध्ये मराठवाड्यात सर्वाधिक मतांनी आमदार होतील असे त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे सांगायचे. मात्र भाजपाने त्यांच्या विरोधात अर्चना पाटील चाकूरकर यांना उतरवले अन् लातूर मतदारसंघात विजयासाठी अमित देशमुखांना शेवटपर्यंत झुंजावे लागले. अवघ्या ७३९८ मतांनी विजयी झाल्यानंतर डोळे उघडलेल्या अमित देशमुखांनी आता आपली ओळख बदलायला सुरुवात केली आहे. निकालानंतरच्या प्रत्येक कृती आता समाज माध्यमातून दिसून येत आहे.
निकालानंतर अमित यांनी सातत्याने आपण कसे जनतेतले नेते आहोत, आपल्याला कशी जनतेच्या प्रश्नांची काळजी आहे, आपल्याला सामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यात कसा रस आहे, असा संदेश देणाऱ्या कृती आवर्जून करायला सुरूवात केली. काही दिवसंपूर्वीच लातूर ते लोहारा (जि.धाराशिव) असा प्रवास करताना रस्ता अपघातात जखमी झालेल्या दोन दुचाकीस्वारांना स्वीय सहायकाच्या गाडीतून रूग्णालयात पाठवल्याचे चलचित्रही माध्यमांमध्ये पाठविले. कधी नव्हे ते लातूरच्या गल्लीबोळातील प्रश्नांना त्यांनी चक्क विधीमंडळात मांडल्याचे या अधिवेशनात पाहायला मिळाले. पूर्वी कोणाच्याही घरी जाताना ‘भैय्यासाहेब’ कुठे बसतील, कोणत्या खुर्चीवर बसतील याची काळजी त्यांचे कार्यकर्ते एक दिवस अगोदर जाऊन घ्यायचे. मात्र दोन दिवसांपूर्वी अधिवेशनातून वेळ काढून हाडोळती (ता. अहमदपूर) येथील मानेवर जू ठेवून कोळपणी करणाऱ्या अंबादास पवार व त्यांच्या पत्नीची भेट घ्यायला गेल्यानंतर ते जमिनीवर अंथरलेल्या पोत्यापासून बनवलेल्या पोत्यावर बसली. कुणीची खुर्ची वगैरेची सोय करायची नाही याच्या सूचना देण्यात आल्या. आणि अमित जमिनीवर बसल्याचे चलचित्र मध्ये येईल याची ‘काळजी’ त्यांच्या माध्यमस्नेही चमूने घेतली यातच सगळे आले, असे निरीक्षण नोंदविले जात आहे. आवज एवढेच नव्हे तर खाद्यांवर नांगर घेऊन मुंबईकडे चालत निघालेल्या एका व्यक्तीला फोन करून संवाद साधत त्याचे चलचित्रणही समाज माध्यमी येईल याची त्यांनी खात्री केली. मे महिन्यात लातूर शहरात जोराचा पाऊस झाल्यानंतर भर ऊन्हाळ्यात घरांमध्ये पाणी शिरलेल्या घटनेची पाहणी करायला ते लगेचच रस्त्यावर उतरल्याचे त्यांच्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पाहायला न मिळालेले चित्र लातूरकरांना ‘पहिल्यांदाच’ पाहायला मिळाले होते.
अमित देशमुख यांच्या या कृतीमुळे भाजप नेत्यांपैकी शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी् जिल्हाध्यक्षपद हाती घेतल्यानंतर अमित देशमुख यांच्या विरोधात अजूनही मीच आहे, असा संदेश दिला आहे. कॉग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने अमित देशमुख यांच्यासमोर नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे आव्हान उभे ठाकेल, असेही सांगण्यात येत आहे.