सांगली : सांगलीतील कृष्णामाईच्या काठी काँग्रेस रूजली, वाजली आणि गाजलीही त्याच सांगलीत आता काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. पक्षाचे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ शहर जिल्हाध्यक्ष पदी काम केलेले, दोन वेळा काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळवलेले पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचे काँग्रेसच्या नेत्यांना काहीही सोयरेसुतक वाटत नाही यावरून काँग्रेसची नेतेमंडळी पक्षाचा विचार न करता आपल्या सोयीचे आणि आत्मकेंद्री राजकारणात मग्न असल्यानेच हे घडत आहे. याचे परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्‍चित पाहायला मिळणार आहेत. भाजपने कोणत्याही स्थितीत काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून गड काबीज करण्याचा चंगच बांधला आहे.

पाटील यांचे वडिल गुलाबराव पाटील हे राज्यसभा सदस्य होते. त्यांनी जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली, सहकार बोर्ड सक्षम केले, जिल्हा बँकेचा पाया घातला. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी बहरात आली. मागील पिढीने गुंतवणूक केेलेल्या भांडवलावर आता नवी पिढी सक्रिय झाली असून या पिढीची आणि सामान्य मतदारांची नाळच जुळलेली नाही. एकेकाळी राज्याचे नेतृत्व करणारा आणि राजकीय निर्णयासाठी सांगलीकडे पाहणार्‍या संपूर्ण राज्यात काँग्रेसची एवढी अवस्था कधीच बिकट झालेली नव्हती. १९९५ मध्ये महायुतीचे सरकार आले त्यावेळी जिल्ह्यात पाच अपक्ष निवडून आले होते. यामागे काँग्रेस अंतर्गत असलेली गटबाजीच कारणीभूत ठरली. स्व. पतंगराव कदम यांचाही दोन वेळा पराभव झाला होता. तरीही काँग्रेसचे नेत्यांना शहाणापणा म्हणजे काय हे सांगायला लागत असेल तर त्यात दोष कुपमंडूक वृत्तीचाच म्हणावा लागेल.

पृथ्वीराज पाटील हे गेली साडेतीन दशके राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, त्यांना सत्तास्थानापासून बाजूला ठेवण्याचे आणि आमचे घराणेच राजकीय वारसदार या वृत्तीतून त्यांना सत्तापदापासून दूर ठेवण्यात आले. यापुढील काळात वसंतदादा घराण्यातच राजकीय संघर्ष पाहण्यास मिळणार असे दिसते. कारण दादा घराण्यातील जयश्री पाटील यांनीही हाती कमळ घेतले आहे. जिल्हा बँकेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. तरीही राजकीय भवितव्य लक्षात घेउन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास प्राधान्य दिले. आता दादा घराण्याचे नेतृत्व खासदार विशाल पाटील यांच्याकडे असले तरी ते लोकसभेवर बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून गेले आहेत. त्यानी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले असले तरी मनाविरूध्द पक्षाने निर्णय घेतले तर सवतासुभा करण्यास मोकळे आहेत. यामुळे काँग्रेसचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्याच खांद्यावर आहे. तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पद त्यांचे मावस बंधू आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे आहे.

सध्या तरी काँग्रेसचे जिल्हाभर नेतृत्व करू शकेल असे एकमेव नेतृत्व डॉ. कदम यांच्याकडे असले तरी त्यांचीही त्यांच्याच पलूस-कडेगाव मतदार संघात भाजपने कोंडी केली आहे. या मतदार संघात राजकीय ताकद असलेल्या क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हेही भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. तिकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सावंत विधानसभेला पराभूत झाल्यापासून कुठे आहेत हेच जिल्ह्याला ज्ञात नाही. डॉ. कदम यांचे जिल्हा नेतृत्व होण्याचे स्वप्न खासदार पाटील यांच्या राजकीय डावपेचाने पूर्ण होण्याची सुतराम शययता नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत आता कुणाची किती ताकद हे कळेलच, वसंतदादा घराण्यात आता चौथी पिढी माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील हे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रात सक्रिय होउ शकतील अशी वंदता आहे. त्याच दिशेने खासदारांकडून त्यांना पुढे केले जात आहे. हे ओळखूनच स्व. मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी कमळ हाती घेतले. आगामी विधानसभेवेळी दादा घराण्याकडून अपेक्षित मदत मिळण्याची शक्यता दुर्मिळ दिसू लागताच पृथ्वीराज पाटील यांनी भाजपचा रस्ता पकडला. भाजप विरोधात असलेल्या नेतेमंडळींना भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

आता भाजपमध्ये कार्यकर्ते आहेतच, पण नेतेमंडळींचीही मोठी गर्दी झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यात भाजपला सुपीक जमिन उपलब्ध करून दिली. त्यावेळी उपरोधाने जेजीपी असा उेख भाजपचा केला जात होता. यामागे वसंतदादा घराण्याचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आणण्याचे डावपेच होते. आता हेच डावपेच काँग्रेसबरोबरच त्यांनाही अडचणीत आणणारे ठरले आहेत. भाजपमध्ये गर्दी झाल्याने मूळचे भाजपचे मोजके कार्यकर्ते ज्यांनी सतरंज्या उचलून पक्ष वाढवला त्यांचीही पदोन्नती झाली आहे. आता सतरंज्या ऐवजी खुर्च्या उचलण्याचे काम त्यांच्याकडे आले आहे. हा काळाचा महिमाच म्हटला पाहिजे. सांगलीत एरवी संथ वाहणार्‍या कृष्णा नदीतील पाण्याचा आणि आश्रयस्थान बनलेल्या मगरीचा जसा पट्टीच्या पोहणार्‍यालाही अंदाज घेणे कठीण आहे तशीच अवस्था राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची झाली आहे.