अलिबाग – चार वर्ष आदिती तटकरे यांना टोकाचा विरोध केल्यानंतर, आता रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांच्या विरोधातील तलवार म्यान केली आहे. दोन्ही पक्षांतील वाद हळूहळू संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनाला आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहण होत आहे, यालाही राजकीयदृष्ट्या बरेच महत्त्व आहे.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वादाला सुरुवात झाली होती. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही पक्षांतील वाद निवळत नव्हता. या वादातूनच शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणीही केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी ती मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे तिन्ही आमदारांनी शिंदे गटात जाऊन महाविकास आघाडी सरकार उलथवून लावण्यात भूमिका बजाविली होती.

हेही वाचा – ओबीसी नेत्यांनाही महत्त्व

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतील सत्तासहभागानंतरही शिवसेना आमदारांची तटकरे विरोधाची धार कायम होती. यातूनच कुठल्याही परिस्थितीत आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देऊ नका, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरण्यात आला होता. त्यामुळे आदिती यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद अद्याप देण्यात आले नव्हते. येवढेच नव्हे तर गेल्या स्वातंत्रदिनी ध्वजारोहणासाठी आदिती यांना रायगडऐवजी पालघर येथे पाठवण्यात आले होते. या विरोधामुळे आदिती यांनी सगळे लक्ष श्रीवर्धन मतदारसंघावर केंद्रित केले होते. इतर पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात कार्यक्रमांना जाणे तिथे हस्तक्षेप करणे टाळले होते. पण आता शिवसेना आमदारांचा तटकरे यांना असलेला विरोध अचानक मावळला आहे.

हेही वाचा – नगर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद कायम राखण्याचे बाळासाहेब थोरात यांच्यासमोर आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधाची तलवार म्यान झाली आहे. दोन्ही पक्षांचे नेते निरनिराळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांतील वाद मिटवा, असे निर्देश तिन्ही पक्षांच्या पक्षनेतृत्वाने दिले होते. गेल्या आठवड्यात आदिती तटकरे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी हे तीन वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र दिसले होते. खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना आमदार महेंद्र दळवी सातत्याने विकास कामांचा एकत्रित आढावा घेताना दिसू लागले आहेत. भरत गोगावले यांनी तटकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे दोन्ही पक्षांतील वाद निवळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथे होणारा रायगडचा मुख्य ध्वजारोहण सोहळा हा पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. गेल्या वेळी आदिती यांना टोकाचा विरोध करणाऱ्या शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांनी आदिती यांच्या हस्ते होणाऱ्या झेंडावंदन कार्यक्रमाला अनुकूलता दर्शविली आहे.