प्रल्हाद बोरसे

मालेगाव: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटींच्या रस्ते कामांच्या भूमिपूजनानिमित्ताने शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येथे श्रेयवादाची लढाई रंगली आहे. ही कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाल्याचे सांगत भुसे हे विकास कामांमध्ये दुजाभाव करीत असल्याची टीका माजी आमदार शेख रशीद यांनी केली आहे. तर आपल्यावर होणाऱ्या आरोपांकडे लक्ष न देता केवळ विकास कामांच्या माध्यमातूनच आपण चोख उत्तर देत असतो, असा पलटवार भुसे यांनी केला आहे. शंभर कोटींच्या निधीतून शहरातील १९ सिमेंट रस्ते आणि तीन पुलांच्या कामास एप्रिल महिन्यात शासनाची मंजुरी मिळाली आहे.

या कामांसाठी राज्य सरकार ७० टक्के निधी देणार असून महापालिकेला ३० टक्के आर्थिक भार सोसावा लागणार आहे. या कामांमध्ये मालेगाव बाह्य मतदार संघात ४३.२३ कोटींच्या १२ आणि मालेगाव मध्य मतदारसंघातील ११.९२ कोटींच्या सहा कामांचा समावेश आहे. ३१.८२ कोटींची चार कामे ही दोन्ही मतदार संघासाठी सामुहिकपणे उपयोगी पडतील अशी आहेत. गेल्या दोन दिवसांत या कामांचे भूमिपूजन सोहळे भुसे यांच्या हस्ते धुमधडाक्यात पार पडले. या निमित्ताने शिंदे गट आणि महानगर राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

हेही वाचा : भारत जोडो यात्रेतील ऊर्जेमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या काँग्रेसमध्ये चैतन्य

महापालिकेत पाच वर्षे काँग्रेस आणि शिवसेनेची युती होती. काँग्रेसचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर असे या युतीचे सूत्र होते. पाच वर्षे या युतीचा संसार सुखेनैव सुरू होता. जानेवारी महिन्यात तत्कालीन महापौर ताहेरा शेख, नगरसेवक असलेले त्यांचे पती शेख रशीद हे अन्य २६ नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. जून महिन्यात येथील महापालिकेचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक राजवट सुरू झाली. त्या पाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. शिंदे गटात गेलेल्या भुसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले. एवढेच नव्हे तर, नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविल्याने भुसे या़चे महत्व आणखी वाढल्याचे अधोरेखित झाले. या बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मालेगावातही शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध बिनसले असून आगामी काळात या दोन्ही पक्षातील राजकीय शत्रुत्व वाढीस लागण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांत भूमिपूजन झालेल्या कामांपैकी मालेगाव मध्य मतदार संघातील कामांचे भूमिपूजन भुसे यांनी एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना सोबत घेऊन आटोपले. एवढेच नव्हे तर, सोमवारी उभयतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत येत्या काळात विकासाचा कार्यक्रम राबविण्याचा निर्धार जाहीर केला. त्याचवेळी मौलाना यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रशीद शेख कुटुंबियांनाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्ष्य करण्याचा प्रयत्न यावेळी केला गेला. मार्च महिन्यात तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव दौऱ्यावर आले असता मालेगावच्या विकास कामांसाठी आपण निधीची मागणी केली होती व त्यानुसार शंभर कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे भुसे यांनी नमूद केले. याशिवाय पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेसाठी आणखी ५५० कोटी रुपयांच्या निधीला नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती देत आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार शेख रशीद यांनीही पत्रकार परिषद घेत शंभर कोटींच्या विकास कामांचे श्रेय हे एकट्या भुसेंचे नसल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेतर्फे २०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. त्या आराखड्यात फेरफार करून भुसे यांनी विशिष्ठ भागाला झुकते माप देणारी कामे घुसवली. ती मंजूर करवून घेतली,अशी टीका शेख यांनी केली. राज्यातील महाविकास आघाडीच्या काळात ही कामे मंजूर झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. ही कामे प्राकलन रकमेच्या १२ टक्के जादा दराने दिली गेल्याने महापालिकेवर जादा भुर्दंड पडणार असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच ही कामे लवकर पूर्ण करण्याच्या नावाखाली कंत्राटदाराऐवजी अनधिकृतपणे उपकंत्राटदार नेमण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोपही शेख यांनी यावेळी केला. मालेगावचे राजकारण या दोन गटातील वादामुळे अधिकच टोकदार होण्याची चिन्हे आहेत.