बीड : पावसाने ओढ दिल्याने यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी नवरात्रौत्सवात दांडिया उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी नेतेमंडळींमध्ये चढाओढच लागली होती. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून नेते, पदाधिकाऱ्यांकडून दांडिया उत्सवाचे आयोजन केले जात आहेत. गटातटात विखुरलेल्या राजकारणात दांडिया उत्सवाने मात्र चांगलेच रंग भरले असून जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी चढाओढ लागली होती.

परळीपाठोपाठ बीडमध्येही दांडिया उत्सवाचे रंग पाहायला मिळाला. एकीकडे पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोयाबीन, कापूस नसल्याने दसरा, दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असताना दुसरीकडे मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्सवाचे रंग भरण्यात लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

हेही वाचा – Telangana : प्रेषितांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राजा सिंहला भाजपाकडून पुन्हा उमेदवारी

बीड जिल्ह्यातील राजकारणाची कुस बदलली आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आता मित्रपक्ष म्हणून का होईना सोबत आले आहेत. काही ठिकाणी कौटुंबिक कलहातून नवीन राजकीय समीकरणे जुळू लागली आहेत. राज्यातील सत्तेत शिवसेना शिंदे गट-भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र असल्याने जिल्ह्यातील राजकारणातही तिन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एकी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाआघाडी म्हणून सोबत असले तरी त्यांच्याकडून वैयक्तिक राजकीय ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमांची रेलचेल केली जात आहे. अजित पवार गटाचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गेवराईत सात दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता नवरात्र उत्सवानिमित्त बीड आणि परळी मतदारसंघात दांडिया उत्सवाचे रंग भरण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्यावतीने परळीत दांडिया महोत्सव घेण्यात आला. अभिनेत्री मानसी नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या महोत्सवाला परळीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. राजश्री धनंजय मुंडे यांनी महोत्सवाचे नेतृत्व करत त्या भागातील महिलांना दांडिया महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध केले.

हेही वाचा – महाप्रबोधन यात्रेतील सुषमा अंधारेंच्या आरोपावर भाजपचे मौन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीड येथील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही काकू-नाना प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिल्यांदाच केशररत्न दांडिया महोत्सव आयोजित करून अभिनेत्री स्मिता गोंदकर यांना आणले होते. या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांनी मुलगा रोहित आणि सून रेशम क्षीरसागर यांना व्यासपीठावर आणले, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही काकांच्या कार्यक्रमाला तोडीसतोड दांडिया उत्सव घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कल्पतरूच्या नावाने डॉ. योगेश यांनी नवजलसा दांडिया उत्सव घेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना बीडमध्ये आणले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याणमंत्री आदिती सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती होती. परळीसह बीड विधानसभा मतदारसंघातील दांडिया उत्सवाने राजकारणात चांगलाच रंग भरला असून खास आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्रींना आणण्याची चढाओढ लागली आहे. दरम्यान या चढाओढीत नेते आणि पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भानही राहिले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी केवळ ६७ टक्के पाऊस झाला असून खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. दसरा, दिवाळीत सोयाबीन आणि कापूस या नगदी पिकांचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात येत असतो. त्याच्यावरच बळीराजाची दिवाळी अवलंबून होती. मात्र, यावर्षी पाऊसच नसल्याने सोयाबीन आणि कापूसही हातातून गेले आहेत. त्यामुळे आता दसरा, दिवाळी साजरी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.