Latest News on Maharashtra Politics Today : २०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार असून दिल्ली अजून दूर आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले, तर फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेत धनंजय मुंडे यांना लक्ष केले. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील युतीच्या चर्चांनी जोर धरला असतानाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एकत्रित भाऊबीज साजरी केली, तर विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदलणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. महाराष्ट्रातील या पाच महत्वाच्या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊ…

फडणवीस म्हणाले, २०२९ पर्यंत मीच मुख्यमंत्री

२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कोणताही बदल होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. माझे कार्यक्षेत्र राज्यापुरतेच मर्यादित असून दिल्ली अजून दूर आहे, असेही ते म्हणाले. दिवाळीच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या भाजपा, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचे सांगितले. ठाकरे ब्रँड शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब हेच असून दुसरा कुणीही होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. मतदानानंतरही दोघे भाऊ एकत्रित राहतील अशी अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांना शिंदेंचा पक्ष फोडायचाय- राऊत

२०२९ पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील; पण मोदी पंतप्रधान राहणार का, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे हे दोन्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, पण फडणवीसांनी त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. भविष्यात महायुती अस्थिर होणार असून मी जेवढे फडणवीसांना ओळखतो, ते शिंदेंच्या बंदोबस्तासाठी समर्थ आहे”, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

मनोज जरांगे पाटील यांनी घेतली पंकजा मुंडेंची बाजू

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे हेच गोपीनाथरावांचे खरे वारसदार असल्याचे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीड येथील ओबीसींच्या मेळाव्यात केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बहीण-भावांमध्ये मिठाचा खडा टाकू नका, असा सल्ला ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी भुजबळांना दिला. आता त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनीच मुंडे घराण्यात राजकीय दरी निर्माण केल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार नसतील तर मग कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा : प्रशांत किशोर यांचं बिहार निवडणुकीबाबत मोठं भाकित; भाजपाचा पराभव होणार? अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाले…

विरोधामुळे शक्तीपीठ महामार्गाचा रुट बदलणार

नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गावरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाला स्थानिक जनतेचा कमी तर राजकीय नेत्यांचा जास्त विरोध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. दिवाळीनिमित्त नागपूर येथील रामगिरी या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.“शक्तीपीठ प्रकल्प हा धार्मिक पर्यटन आणि राज्यातील संपर्क सुविधा वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिल्ह्यांमधून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी तो लाभदायी ठरेल. मात्र, धाराशीव परिसरात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला आहे. या विरोधाचा आदर ठेवत सरकारने मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Shaniwar Wada : शनिवार वाड्याला लागून असलेली ‘ती’ कबर मस्तानीच्या मुलाची? इतिहासाचे अभ्यासक नेमकं काय म्हणाले?

शिवतीर्थावर भाऊबीज साजरी, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाऊबीजेच्या निमित्ताने आज पुन्हा एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. जयवंती देशपांडे यांच्या घरी दोघेही एकत्रित दाखल झाले. यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य यांचीही उपस्थिती होती. भाऊबीज साजरी केल्यानंतर उद्धव हे मातोश्रीवर परतले तर राज ठाकरे शिवतीर्थाच्या दिशेने रवाना झाले. गेल्या काही महिन्यात राज आणि उद्धव यांच्या आठवेळा भेटीगाठी झाल्या आहेत. दोघांमधील या स्नेहभेटी कौटुंबिक कारणांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिकेसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही भावांमध्ये युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.